SR 24 NEWS

इतर

असुरक्षित व्यापाऱ्यांचा सोनई पोलिस ठाण्यावर पुन्हा मोर्चा, हल्लेखोर मोकाट असल्याचा आरोप ; पोलिसांची बघ्याची भूमिका धोकादायक

Spread the love

सोनई  प्रतिनिधी ( मोहन शेगर) : सोनई शहर व परिसरात वाढलेल्या गुन्हेगारी प्रवृत्ती, व्यापाऱ्यांवरील हल्ले व पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात गुरुवारी सोनईतील व्यापारी व ग्रामस्थांनी पुन्हा एकदा सोनई पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला. हॉटेल व्यावसायिकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

सोनई येथील हॉटेल व्यावसायिक लखन जगदाळे यांच्यावर ३ डिसेंबर रोजी ८ ते १० जणांच्या टोळीने हल्ला केला होता. हॉटेलमध्ये घुसून आरोपींनी गल्ल्यातील रोख रक्कम लुटली व कत्ती, तलवारीने हल्ला करत जगदाळे यांना गंभीर जखमी केले. उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात असताना जगदाळे यांनी जबाब देऊन संशयितांची नावे पोलिसांना सांगितली होती. मात्र घटनेला १५ दिवस उलटूनही केवळ एका आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप जगदाळे कुटुंबीयांनी केला आहे.

सोनई परिसरात व्यापाऱ्यांकडून खंडणी मागणारी टोळी सक्रिय असून, खंडणी न दिल्यास मारहाण व धमकीचे प्रकार घडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जगदाळे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर काही दिवसांतच व्यापारी अनिल शेटे यांनाही धमकी देण्यात आल्याची घटना घडली. या वाढत्या असुरक्षिततेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

यावेळी पोलिसांवर गंभीर आरोप करताना सांगण्यात आले की, १९ नोव्हेंबर रोजी याच आरोपींनी सोनई पोलिस ठाण्यात धिंगाणा घातला होता. त्यावेळी कठोर कारवाई झाली असती, तर आजचे हल्ले व धमक्या टळल्या असत्या. मात्र पोलिसांनी सोयीस्कर दुर्लक्ष करत आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास सोनई बंद ठेवून पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक शेळके यांनी संबंधित आरोपींवर लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले.या मोर्चात प्रकाश शेटे, अनिल शेटे, संदीप लांडे, ज्ञानेश्वर दरंदले यांच्यासह अनेक व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!