SR 24 NEWS

इतर

बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांचे जीव धोक्यात ; १२ तास दिवसा वीज द्या – माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची मागणी

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : अहिल्यानगर जिल्ह्यात, विशेषतः राहुरी तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेता शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शेतीसाठी किमान १२ तास दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी ठाम मागणी माजी ऊर्जा राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे शेतकरी, महिला, शाळकरी मुले तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सध्या महावितरणकडून शेतकऱ्यांना कधी दिवसा तर कधी रात्री अशा पद्धतीने वीजपुरवठा केला जात आहे. गहू, हरभरा, ऊस तसेच इतर पिकांची लागवड सुरू असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागत आहे. मात्र, रात्रीच्या वेळी बिबट्यांच्या संचारामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून किमान १२ तास तरी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मा. प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.

ऊर्जा राज्यमंत्री असताना मा. तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघासह संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठ्याचा मुद्दा सातत्याने विधानसभेत प्रभावीपणे मांडला होता. अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी दूरदृष्टी ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर देण्यात आला. राहुरी–पाथर्डी–नगर मतदारसंघातील बाभुळगाव, आरडगाव, वांबोरी, म्हैसगाव आदी गावांमध्ये प्रतिनिधिक स्वरूपात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले असून ते कार्यान्वित झाल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली आहे. त्याचबरोबर वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात आल्याने हजारो शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्याचा लाभ होत आहे.

रात्रीच्या अंधारात शेतीकाम करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला धोका असून, वन्य प्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्राण, पिके आणि शेती उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने तातडीने दिवसा वीजपुरवठ्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!