SR 24 NEWS

इतर

मानोरी येथे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार,पाणीटंचाईच्या प्रश्नावर तातडीच्या उपाययोजनांची गरज – माजी उपसभापती रविंद्र आढाव

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ )  : बारागाव नांदूरसह चौदा गावांची संयुक्त पाणीपुरवठा योजना कागदोपत्री यशस्वी मानली जात असली, तरी या योजनेच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मानोरी गावाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या मानोरी गावात आठ ते दहा दिवसांतून केवळ एकदाच पाणीपुरवठा होत असून, पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे या गंभीर समस्येकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राहुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र आढाव यांनी केले.

रेणुकामाता पाणी वाटप संस्थेच्या चेअरमनपदी एकनाथ थोरात यांची तसेच मानोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी एकनाथ आढाव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मानोरी ग्रामस्थ व श्री रेणुकामाता पायी दिंडी सोहळा समिती यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन माजी उपसभापती रविंद्र आढाव यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभूगिरी महाराज गोसावी होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. बाबासाहेब आढाव यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा परिचय करून देत, पाणीपुरवठा व ग्रामविकासाच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज अधोरेखित केली.

या प्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन एकनाथ थोरात व उपसरपंच एकनाथ आढाव यांचा पारंपरिक फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. योगेश आढाव यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना रविंद्र आढाव म्हणाले, “बारागाव नांदूरसह चौदा गावांची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असली, तरी मानोरी गाव योजनेच्या शेवटच्या टोकाला असल्यामुळे येथील पाण्याची टाकी अनेकदा पूर्ण भरत नाही. परिणामी ग्रामस्थांना नियमित पाणी मिळत नाही. ही समस्या केवळ तांत्रिक नसून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ती अधिक गंभीर बनली आहे. पाईपलाईनवरील दाब, पाणी वितरणाचे वेळापत्रक, तसेच टाकीच्या क्षमतेचा तातडीने आढावा घेणे गरजेचे आहे.”

 

ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, पाणीपुरवठा विभाग व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन समन्वयाने काम केल्यास मानोरी गावाला किमान चार दिवसांतून एकदा तरी नियमित पाणीपुरवठा शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

या कार्यक्रमास किशोर महाराज जाधव, माजी सरपंच हाजी अब्बासभाई शेख दयावान, माजी संचालक उत्तमराव आढाव, माधवराव आढाव, माध्यमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन उत्तमराव खुळे सर, युवा नेते बापूसाहेब वाघ, सोसायटीचे माजी चेअरमन नवनाथ थोरात, संचालक भास्कर भिगारे, माजी उपसरपंच अण्णासाहेब तोडमल, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आढाव, नानासाहेब आढाव, शामदभाई शेख, संजय पोटे, भागवत आढाव, गोकुळदास आढाव सर, अ‍ॅड.संजय पवार, संजय डोंगरे, लतीफभाई पठाण, डॉ. बाबासाहेब आढाव, पंढरीनाथ विटनोर, हमजेखा पठाण, दादासाहेब पारधे, फक्कडभाई शेख, मनोज ठुबे, संजय जाधव, शौकत पठाण, शिवाजी पोटे, वसंत आढाव, मुकेश थोरात, रामदास बाचकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना एकनाथ थोरात व एकनाथ आढाव यांनी ग्रामस्थांचे आभार मानत, “पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व इतर मूलभूत सुविधांसाठी सर्वांना सोबत घेऊन पारदर्शक, लोकाभिमुख व विकासाभिमुख कारभार करू,” असा निर्धार व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब आढाव यांनी केले, तर आभार प्रदर्शन नवनाथ थोरात यांनी केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!