अहिल्यानगर: पारनेर तालुक्यातील किन्ही-गोरेगाव रस्त्यावर आज, मंगळवारी दुपारी सुमारे ३.३० वाजता शेतात काम करत असलेल्या वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिचा मृत्यू केला. मृत्युमुखी पडलेल्या वृद्धेचे नाव भागुबाई विश्वनाथ खोडदे (वय ६५, रा. किन्ही, पारनेर) असे आहे.
भागुबाई खोडदे शेतात हरभऱ्याच्या खुरपणी करत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि फरपटत नेले. त्यावेळी त्यांचे पती शेजारच्या शेतात गव्हाला पाणी देत होते. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि आरडाओरडा करून ग्रामस्थांना बोलावले. ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला जंगलाकडे ढकलण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पारनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धांडे, वनपाल के. एस. साबळे, एम. वाय. शेख, एस. एल. भालेकर, तसेच वनरक्षक एन. व्ही. बडे, एफ. एस. शेख, बी. एस. दवणे, जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवचिकित्सेसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पारनेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
किन्ही, बहिरोबावाडी परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे ग्रामपंचायत सदस्य अनिल देठे यांनी सांगितले. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने वेळोवेळी वन विभागाला पिंजरा लावण्याची मागणी केली होती; मात्र वनविभागाच्या ढिल्या कारभारामुळे वृद्धेचा बळी गेला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या आठवड्यातच किन्ही परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन मेंढ्या ठार झाल्या होत्या, तसेच घोडे, शेळ्या आणि कुत्र्यांवरही हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. वृद्धा ठार झाल्याने किन्ही, गोरेगाव, बहिरोबावाडी आणि तिखोल परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे.
दोन महिन्यांपूर्वीही पारनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलाचा आणि एका कामगाराचा मृत्यू झाला होता. ही घटनेनंतर बिबट्याचा हा तिसरा बळी ठरला आहे. जिल्ह्यात अनेक भागात बिबट्याच्या हल्ल्याची नोंद आहे आणि त्यासाठी आंदोलनेही सुरू आहेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी वन विभाग अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. पालकमंत्री विखे यांनी बिबट्याच्या प्रतिबंधक उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तब्बल ८ कोटी रुपये मंजूर केले आहेत; मात्र बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांची सुरक्षा अजूनही धोक्यात आहे. वन्यजीव विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात सुमारे ११५० बिबटे आढळले आहेत.
Leave a reply













