देहरादून – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) च्या 71व्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप 30 नोव्हेंबर 2025 रोजी भगवान बिरसा मुंडा नगर, देहरादून येथे उत्साहात झाला. 28 ते 30 नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांच्या हस्ते झाले.अधिवेशनाच्या समारोप सत्रात वर्ष 2025–26 या कालावधीसाठी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये विदर्भातील मूर्तिजापूर तालुक्याचे विद्यार्थी मनीष किशोर फाटे यांची एग्रीव्हिजनचे राष्ट्रीय संयोजक म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे उपस्थित सर्व पदाधिकारी, प्रतिनिधी व अतिथींनी स्वागत करत त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मनीष फाटे 2013 पासून ABVPशी जोडलेले असून प्रांत संयोजक, प्रांत सहमंत्री तसेच राष्ट्रीय सहसंयोजक अशा विविध महत्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सध्या ते महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील जल-सिंचन व निकास अभियांत्रिकी विभागात डॉक्टरेट अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून डॉ. एस. के. डिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस पिकाच्या जल-उत्पादकतेवर संशोधन करत आहेत.
कृषी शिक्षण, संशोधन, नवकल्पना, कौशल्य विकास आणि युवा नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी कार्यरत असलेल्या एग्रीव्हिजन मंचाच्या माध्यमातून देशभरातील कृषी विद्यार्थी, संशोधक आणि युवा उद्योजक यांना जोडून विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी मनीष फाटे पार पाडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या नियुक्तीमुळे कृषिक्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून राष्ट्रीय पातळीवर ग्रामीण युवकांचे नेतृत्व अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
Leave a reply













