SR 24 NEWS

राजकीय

नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी काट्याची टक्कर  ; धरणे – काझी रस्सीखेच अटळ

Spread the love

तुळजापूर दि.19 (चंद्रकांत हागलगुंडे) : धाराशिव जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी यंदा अभूतपूर्व चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यानंतर निवडणूक पूर्णपणे सरशीची झाली असून महायुतीचे उमेदवार बसवराज आप्पा धरणे व एमआयएमचे उमेदवार माजी नगराध्यक्ष शहबाज काझी यांच्यात थेट सामना रंगणार आहे. कोणाच्या बाजूने जनमत झुकते हे येणारा काळच निश्चित करणार आहे.

महाविकास आघाडीत ताळमेळाचा अभाव आणि अंतर्गत मतभेद याचा थेट परिणाम निवडणूक समीकरणांवर दिसत असून त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवार बसवराज धरणे यांना होऊ शकतो, असा तज्ञांचा अंदाज आहे. दुसरीकडे माजी नगराध्यक्ष शहबाज काझी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एमआयएममध्ये प्रवेश केला असून स्वतःचे स्वतंत्र राजकीय वलय निर्माण केले आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांकडे स्वत:ची ताकद असून निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित मानले जात आहे.

बसवराज आप्पा धरणे यांची स्वच्छ प्रतिमा, सक्रिय जनसंपर्क आणि दीर्घ राजकीय अनुभव त्यांना बळ देत आहेत. तर शहबाज काझी यांच्या कारकिर्दीतील मजबूत जनाधार, पूर्वीचे कार्यकर्त्यांचे जाळे आणि भक्कम मुस्लिम मताधार त्यांना निर्णायक ताकद देत आहे. यामुळे मतांच्या विभागणीमुळे या दोघांमध्येच खरी पडझड होण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, स्वहित जोपासणाऱ्या नेत्यांना मतदारांकडून धडा मिळेल, असा सूर स्थानिक राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. देश व राज्यात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव आणि तालुक्यातील भाजप नेतृत्वाचा दबदबा याचा प्रभाव निवडणुकीत दिसून येईल, असा अंदाजही वर्तवला जात आहे. तसेच काँग्रेसमधील मतभेदामुळे आघाडीला तोटा होण्याची चिन्हे दिसत आहेत.

या निवडणुकीत तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगदीशसिंह पाटील आणि युवा नेते सुनील चव्हाण यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष नळदुर्गकडे लागले आहे. बहुरंगी लढत असली तरी नगराध्यक्ष पदासाठी खरी टक्कर धरणे विरुद्ध काझी अशीच रंगणार हे मात्र निर्विवाद.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!