राहुरी प्रतिनिधी ( सोमनाथ वाघ) : राहुरी तालुक्यातील मांजरी (ता. राहुरी) येथील प्राथमिक शिक्षक गोरक्षनाथ जनार्दन विटनोर यांची जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीने संपूर्ण मांजरी गावाचा अभिमान उंचावला असून, ग्रामस्थांनी जल्लोषात विजयाचा उत्सव साजरा केला.
या निवडीमागे शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते श्री. बापूसाहेब तांबे यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ लाभले. संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य शिक्षकांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा श्री. तांबे यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असून, विटनोर यांची निवड ही त्या प्रयत्नांची फलश्रुती असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी मांजरी ग्रामस्थांच्या वतीने विटनोर यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला. डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे संचालक व शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, युवा नेते हर्ष तनपुरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ग्रामस्थांनी डीजेच्या ठेक्यावर मिरवणूक काढून गावभर जल्लोष केला. मिरवणुकीचा प्रारंभ अहिल्यादेवी होळकर चौकातील पुतळ्याला अभिवादन करून झाला. त्यानंतर ग्रामदैवत चंद्रगिरीचे दर्शन घेऊन मास्ती मंदिरासमोर सत्कार सोहळा पार पडला.
या वेळी हर्ष तनपुरे म्हणाले, “मांजरीसारख्या गावातील व्यक्तीस जिल्ह्याच्या प्रतिष्ठित आणि मानाच्या पदावर निवड मिळणे ही अभिमानाची बाब आहे. अशा यशस्वी नेतृत्वामुळे ग्रामीण भागातील युवकांनाही प्रेरणा मिळेल. ”या कार्यक्रमात सोपान बाचकर, सेवानिवृत्त शिक्षक भारत विटनोर, तसेच अन्य मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोविंद जुंधारे यांनी भूषविले. सत्काराला उत्तर देताना गोरक्षनाथ विटनोर हे भावुक झाले आणि गावकऱ्यांच्या प्रेमाने भारावून गेले.
या कार्यक्रमाला रविंद्र आढाव, भाऊसाहेब आढाव, विजय तमनर, आशिष बिडगर, अण्णासाहेब विटनोर, कुशाराम जाधव, रविकिरण साळवे, अरुण डोंगरे, गोरक्षनाथ घोलप, अशोक विटनोर, बाबाजी डुकरे, बाबासाहेब डोंगरे, हिरामण गुंड, नारायण सरोदे, राजेंद्र मरभळ, शिवाजी गवते, नानासाहेब रुपनर, दगडू काकड, संजय तेलोरे, संजय जाधव, नवनाथ खंडागळे, प्रशांत बोरुडे, अशोक ननवरे, सुरेश गिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “संघटनेचे कार्य हे सर्वसामान्य शिक्षकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आहे. गोरक्षनाथ विटनोर यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही त्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. ”गावाच्या भूमिपुत्राच्या या निवडीमुळे मांजरी गावात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी “गोरक्षनाथ विटनोरांचा जयघोष” करीत आनंदोत्सव साजरा केला.
मांजरीचे सुपुत्र गोरक्षनाथ विटनोर यांची जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड – मांजरी येथे जल्लोष, युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या उपस्थितीत मांजरी येथे भव्य सत्कार सोहळा संपन्न

0Share
Leave a reply












