राहुरी वेब प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. या निवेदनात शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचे, जमिनीचे तसेच बांधांचे झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर माहिती देत प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील ऊस, कांदा, भाजीपाला आणि धान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओढ्यांची दुरुस्ती व साफसफाईचे काम अपूर्ण राहिल्यामुळे पाण्याचा निचरा न होऊन शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती व पिके वाहून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वाघाचा आखाडा येथील शेतकरी आदिनाथ बाळासाहेब तनपुरे यांच्यासह ५६१ गटातील अनेक शेतकऱ्यांची शेती या अतिवृष्टीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. गाव नकाशानुसार असलेला ओढा वर्षानुवर्षे अतिक्रमणामुळे बुजविण्यात आला असून, मागील वर्षी प्रशासनाने ओढा खोदकामाचे काम सुरू केले होते. मात्र, ते काम अर्धवट राहिल्याने या वर्षी संपूर्ण परिसरातील पाणी शेतात शिरले व पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ओढ्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने झाले असते तर इतका मोठा अनर्थ टळला असता. त्यांनी या संदर्भात वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधले असतानाही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे या हलगर्जीपणाबद्दल निषेध नोंदवत त्यांनी आत्मदहन करण्याची परवानगी मागितली आहे.
शेतकरी तनपुरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आमच्या शेतजमिनींना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पिके, माती, बांध सर्व वाहून गेले असून आम्ही आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालो आहोत. त्यामुळे आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना १५ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यास परवानगी द्यावी.”
सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगरपालिका प्रशासनाला पाठविण्यात आल्या आहेत. या निवेदनावर आदिनाथ बाळासाहेब तनपुरे, शरद रायभान तनपुरे, शिवाजी निवृत्ती तनपुरे, भागवत चांगदेव तनपुरे, विनोद चांगदेव तनपुरे, सर्जेराव लिंबराज तनपुरे, भाऊसाहेब लिंबराज तनपुरे, सुधाकर एकनाथ तनपुरे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
शेतकऱ्यांची मागणी आहे की, तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, ओढ्यांची दुरुस्ती पूर्ण करावी आणि अशा प्रकारच्या दुर्लक्षाबद्दल जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहेत.
आर्थिक संकटात सापडलेल्या राहुरीतील शेतकऱ्यांनी मागितली प्रशासनाकडे आत्मदहनाची परवानगी

0Share
Leave a reply












