श्रीरामपूर प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागला आहे. “कार्यकर्त्यांनी एकदिलाने सज्ज व्हावे आणि मतदारांपर्यंत पक्षाचा संदेश पोहोचवावा,” असे आवाहन रासपचे जिल्हाध्यक्ष नंदूभाऊ खेमनर यांनी केले.
राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा या नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, या तिन्ही तालुक्यांमध्ये रासपने संघटनात्मक पातळीवर भक्कम पायाभरणी केली आहे. अलीकडच्या काळात पक्षाने ग्रामीण आणि शहरी भागातील जनसंपर्क वाढवत सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन केला आहे.
“शेतकरी आज संकटात आहे. शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारीच्या प्रश्नांनी जनतेचे जगणे कठीण झाले आहे. या सर्व प्रश्नांवर ठोस भूमिका मांडण्यासाठी आणि शेतकरी, कामगार, सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी रासप निवडणुकीत ताकदीने उतरतोय,” असे खेमनर यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, रासपचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेवते, मुख्य महासचिव माऊली नाना सलगर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रल्हाद पाटील, महाराष्ट्र सरचिटणीस अजित दादा पाटील, आणि जिल्हा संपर्कप्रमुख नानासाहेब जुंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांमध्ये पक्ष संघटन जोरात काम करत आहे.
पक्षाने कार्यकर्त्यांना तळागाळातील लोकांशी संपर्क वाढवण्याचे, सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवण्याचे आणि जनतेच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले आहे. आगामी निवडणुकांमध्ये रासप स्वबळावर विजय मिळवण्यासाठी सज्ज झाल्याचे खेमनर यांनी सांगितले.
Leave a reply













