नेवासा ( वेब प्रतिनिधी) : घोडेगाव (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथील जनावरांच्या आठवडे बाजारात मेंढपाळांवर होत असलेल्या अन्याय, दहशत व मारहाणीच्या घटनांचा निषेध म्हणून महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन संघटनेतर्फे उद्या शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत उप कृषी उत्पन्न बाजार समिती, घोडेगाव समोर अहिल्यानगर–संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून घोडेगाव जनावर बाजारात स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या एजंटांकडून मेंढपाळांवर अत्याचार, धमक्या व जबरदस्तीचे प्रकार वाढले आहेत. देडगाव येथील मेंढपाळ वाघमोडे यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मेंढपाळ समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. स्वस्तात मेंढ्या विकत घेण्यासाठी स्थानिक गुंडांनी दहशत माजवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, परराज्यातील व्यापाऱ्यांना बाजारात येऊ न देणे, अनधिकृत पावत्या फाडणे, मेंढपाळांना धमकावणे आणि जबरदस्तीने जनावरे स्वस्तात खरेदी करणे असे प्रकार सुरू असल्याची तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती व सोनई पोलिसांना वारंवार सूचना देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, उलट प्रशासनाने गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडे दुर्लक्ष करून त्यांना संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दोन महिन्यांपूर्वी विधान परिषदेचे सभापती ना. प्रा. राम शिंदे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांना मेंढपाळ समाजाने निवेदन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर मेंढपाळ समाजाने आक्रोश आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. आंदोलनादरम्यान उप कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी व सोनई पोलिसांनी उपस्थित राहून निवेदन स्वीकारावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
आंदोलनादरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडल्यास त्यास बाजार समिती व पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम सरक यांनी दिला आहे.
घोडेगाव बाजारातील गुंडगिरीविरोधात मेंढपाळांचा संताप ; महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन संघटनेतर्फे उद्या रास्ता रोको

0Share
Leave a reply












