नांदेड प्रतिनिधी (धम्मदिप भद्रे ) : जागतिक आरोग्य, पर्यावरण, दहशतवाद, लोकशाही, हवामान बदल, महिला सक्षमीकरण, जागतिक आरोग्य , प्रदूषण नियंत्रण, आधुनिक तंत्रज्ञान, सक्षम संसदीय कार्यप्रणाली यासह अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करीत, ६८ वी कॉमनवेल्थ पार्लमेंटरी कॉन्फरन्स (सीपीसी) ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे संपन्न झाली आहे. या आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल संसदीय परिषदेत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवरील चर्चेमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.
ब्रिजटाऊन बार्बाडोस येथे दि. ५ ते १२ ऑक्टोबरदरम्यान ६८ वी राष्ट्रकुल संसदीय परिषद पार पडली. या संसदेच्या अध्यक्षा ज्युलियट होलसेस यांच्यासह जगभरातील ५६ राष्ट्रांतील प्रतिनिधी या परिषदेत उपस्थित होते. भारतातून लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, खा. डॉ. अजित गोपछडे, डॉ. रेखा शर्मा, खा. पुरंदरेश्वरी, खा. विष्णूदत्त शर्मा, खा. के. सुधाकर, खा. अनुराग शर्मा यांनी सहभाग नोंदविला.
तब्बल सात दिवस चाललेल्या या परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावर संसदीय सहकार्य वाढविणे, तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करणे, लोकशाही मूल्ये मजबूत करणे, आंतरराष्ट्रीय दहशतवाद, जागतिक आरोग्य, लोकसंख्या, कृषी, पर्यटन, पर्यावरण आणि शिक्षण अशा महत्त्वाच्या विषयांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली. संरक्षण, व्यापार, अक्षय ऊर्जा, विज्ञान-तंत्रज्ञानावरही चर्चा करीत शांततापूर्ण समृद्ध जगासाठी सामायिक वचनबद्धता निश्चित करण्यात आली. भारतीय संसद नवोपक्रमात आघाडीवर आहे. कायदेविषयक प्रक्रियांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता, जबाबदारी वाढविण्यासाठी डिजिटल संसद आणि एआय संचालित बहुभाषिक साधनांसारखे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा या परिषदेत आढावा घेण्यात आला.
ऑस्ट्रेलिया, झिम्बॉब्वे, अमेरिका, झांबिया आणि जैमिका आदी राष्ट्रांतील सदस्यांशीही यावेळी खा.डॉ. अजित गोपछडे यांनी संवाद साधला. विचारांची देवाण-घेवाण केली. या आंतर राष्ट्रीय परिषदेतील अनुभव हा पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताला अधिक भक्कम आणि सक्षम बनविण्यासाठी निश्चितपणे कामाला येईल, असा विश्वास खा.डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केला आहे.
६८वी कॉमनवेल्थ पार्लमेंटरी कॉन्फरन्स संपन्न : खा.डॉ. अजित गोपछडेंचा आंतरराष्ट्रीय परिषदेत अनेक विषयांवरील चर्चेत सहभाग

0Share
Leave a reply












