SR 24 NEWS

इतर

राहुरी बसस्थानक परिसरात शेंगदाणा व चिक्की विक्री करणाऱ्या इसमाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

राहुरी प्रतिनिधी ( सोमनाथ वाघ) : राहुरी शहरात राहत्या घरात ६५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ४ ऑक्टोबर) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. मृत इसमाचे नाव अब्दुल बाबूमिया शेख (वय ६५) असे असून ते राहुरी बसस्थानक परिसरात शेंगदाणा व चिक्की विक्री करून उपजीविका भागवत होते.

घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते, पोलीस कर्मचारी सचिन ताजणे व नदीम शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घरातील छताच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने शेख यांनी गळफास घेतल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलीस मित्र आलम शेख व अरविंद माळी यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवण्यात आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल शेख हे राहुरी शहरात आपल्या घरात एकटेच वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात कुणी वारसदार नसल्याचे समोर आले आहे. त्यांनी उपजीविकेसाठी बसस्थानक परिसरात शेंगदाणा व चिक्की विक्री सुरू ठेवली होती. मात्र, त्यांनी कोणत्या मानसिक तणावातून किंवा नैराश्यातून आत्महत्येचे पाऊल उचलले हे स्पष्ट झालेले नाही.

अब्दुल शेख यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलिस करीत आहेत.


Spread the love
error: Content is protected !!