राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : मानोरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच चेअरमन शरदराव दगडू पोटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. संस्थेच्या आर्थिक मजबुतीबरोबरच आगामी काळात विविध विकासकामांना गती देण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव भीष्मराज गरुड यांनी केले.सभेत सर्वप्रथम मागील वर्षीच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले आणि त्यास सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली. त्यानंतर आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचे आर्थिक पत्रक व लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आले. संस्थेची आर्थिक स्थिती समाधानकारक असून, काही तांत्रिक त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आल्या व त्या दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले.
आगामी वर्ष २०२५-२६ साठी संस्थेच्या कर्जमागणीचे अधिकार संचालक मंडळास प्रदान करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच थकबाकीदार सभासदांची तपासणी पंचकमिटीमार्फत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. वसुली कार्यवाही अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचा ठरावही संमत करण्यात आला.
नवीन लेखापरीक्षकांची नियुक्ती आणि पारदर्शक कारभारावर भर
संस्थेच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी नव्या लेखापरीक्षकांची नियुक्तीही करण्यात आली. यामुळे लेखापरीक्षण प्रक्रिया अधिक प्रभावी व वेळेवर पार पडेल, असे मत काही सभासदांनी व्यक्त केले.चेअरमन शरदराव पोटे यांनी माहिती दिली की, संस्थेच्या मालकीच्या पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या जागेवर व्यवसायिक कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाद्वारे संस्थेला दीर्घकालीन उत्पन्नाची शाश्वत संधी उपलब्ध होणार असून परिसरातील नागरी सुविधांनाही चालना मिळणार आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेने सामाजिक जाणीव ठेवत खर्चिक सत्कार, पुष्पगुच्छ, फलकबाजी यासारख्या गोष्टी टाळत सभा साधेपणात पार पाडली. हा निर्णय सभासदांनी एकमताने स्वागतार्ह ठरवला.
“सध्या गरज आहे ती शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची. संस्थेचा प्रत्येक खर्च विचारपूर्वक आणि गरजेनुसारच केला जाणार आहे. शेती संकटात असताना खर्चिक सोहळे टाळणे ही काळाची गरज आहे,
”— असे प्रतिपादन चेअरमन शरदराव पोटे यांनी यावेळी केले.
सभेच्या शेवटी भाऊसाहेब आढाव यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत अभिनंदनाचा ठराव मांडला.संस्थेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सभासद व ग्राहकांसाठी स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करणे, बँकेच्या रंगरंगोटी व दुरुस्तीचे काम, पाण्याच्या टाकीजवळील विकासकामे तातडीने सुरू करणे,गोडावून समोरील जागेचा विकास व संबंधित शासकीय प्रलंबित कामांची पूर्तता
या ठरावास संजय पवार यांच्यासह अनेक सभासदांनी अनुमोदन दिले.या सभेला सचिव काशिनाथ काळे, व्हा.चेअरमन प्रतिनिधी बाळकृष्ण आढाव, संचालक भास्कर भिंगारे, रायभान आढाव, साहेबराव बाचकर, गोरक्षनाथ खुळे, दत्तात्रय आढाव, रावसाहेब चुळभरे, बाबादेव काळे, कर्मचारी ज्ञानदेव शेळके, चंद्रकांत पोटे यांच्यासह आदी मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी चेअरमन शरदराव पोटे यांनी सर्व सभासदांचे आभार मानत संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सभासदांनी संस्थेच्या पारदर्शक, सहकार्यशील व विकासाभिमुख कार्यपद्धतीचे मनापासून कौतुक केले.
Leave a reply













