राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथील माहुचा मळा परिसर, मल्हारवाडी आणि घोरपडवाडी भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली. सलग मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले असून, ही गंभीर परिस्थिती पाहता त्यांनी तात्काळ ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची व सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली. तनपुरे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे मका, घास, कपाशी, सोयाबीन यांसारखी पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून अनेक शेतमाळे गुडघाभर पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांचे कष्ट पाण्याबरोबर वाहून गेले असल्याने त्यांची हतबल अवस्था झाली आहे.
सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत अत्यंत अपुरी असल्याची टीका करताना तनपुरे यांनी, “शेतकऱ्यांच्या नुकसानीची तीव्रता लक्षात घेता भरीव निधीची तरतूद आणि सरसकट कर्जमाफी हीच खरी काळाची गरज आहे. अन्यथा कर्जाच्या बोज्याखाली शेतकऱ्यांचा पूर्ण धीर खचेल,” अशी भीती व्यक्त केली. “आज शेतकरी निराशेच्या गर्तेत आहेत. अशा वेळी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहून योग्य मदत करणे ही सरकारची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नारायण जाधव, किशोर कोहकडे, मंगेश गाडे, हरिभाऊ हापसे, राजू गाडे, विश्वास तात्या पवार, गोवर्धन गाडे, सुरेश गाडे, भाऊसाहेब गाडे, सुभाष गाडे, विक्रम गाडे, सौरभ गाडे, किशोर गाडे, सोमनाथ गाडे, रज्जाक इनामदार, लहू थोरात, भास्कर गाडे, प्रकाश गाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
राहुरी तालुक्यात प्राजक्त तनपुरे यांची पाहणी – ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि सरसकट कर्जमाफीची मागणी

0Share
Leave a reply












