SR 24 NEWS

इतर

राहुरी शहरात अतिवृष्टीचा कहर: शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान, मदतीची मागणी जोरात,”शेतकऱ्यांची आमदार कर्डिले यांच्याकडे मागणी – तातडीने पंचनाम्याचे आदेश द्यावेत”

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ ) २८ सप्टेंबर : राहुरी शहरात आणि आसपासच्या परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून याचा गंभीर फटका शेतकरी व नागरिकांना बसला आहे. पिंपळाचा मळा रोड, जुना कनगर रोड, वाघाचा आखाडा, काळे आखाडा,एस. आर. हॉटेलसमोरील सातभाई आणि भुजाडी मळा या भागांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे, कांदा चाळींचे, गोठ्यांचे, चाऱ्याचे तसेच जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे कांद्याचे साठे पाण्यात भिजून खराब झाले आहेत. जनावरांचा चारा वाहून गेला असून काही गोठ्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनावरांचेही हाल झाले आहेत.

या नुकसानीबाबत शेतकरी शीतल तनपुरे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, अतिवृष्टीमुळे आम्हा शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी तहसीलदार व प्रशासनाला आदेश देऊन तातडीने पंचनामे करून मदत कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली. सुधाकर तनपुरे, सुरेंद्र तनपुरे आदी शेतकऱ्यांनी देखील शासन आणि आमदारांनी लक्ष घालून लवकरात लवकर मदत मिळावी, अशी विनंती केली आहे.

राहुरी नायब तहसीलदार  सोपान बाचकर यांनी पिंपळाचा मळा परिसरातील पाहणी दरम्यान सांगितले की, शहरात ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. अनेक घरांत पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. नगरपरिषदेची आपत्ती व्यवस्थापन टीम लवकरच घटनास्थळी दाखल होणार आहे. शासनाच्या आदेशानुसार पिकांचे, कांदा चाळींचे, गोठ्यांचे व जनावरांचे नुकसान यांचे तातडीने पंचनामे करण्यात येणार असून, कोणाचाही पंचनामा राहणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. या पाहणीवेळी अजय शिंदे हे देखील उपस्थित होते.

या संपूर्ण घटनेनंतर शेतकरी वर्गामध्ये चिंता व अस्वस्थता पसरली असून शासनाने लवकरात लवकर मदतीची कार्यवाही सुरू करावी, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे. शासनाने या नैसर्गिक आपत्तीचा गांभीर्याने विचार करून सर्वांचे नुकसान भरपाईसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

यावेळी घटनास्थळी नानासाहेब तनपुरे,कुंडलिक मोरे,दत्तात्रय ढवळे, संपत तनपुरे, सचिन ढवळे,अनिल जाधव, मनीषा मोरे, रमेश शिंदे, सचिन तनपुरे, सुजित गुलदगड आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!