SR 24 NEWS

इतर

अणदूर येथे मुसळधार पावसाचा कहर – मेंढपाळाचे मोठे नुकसान, 13 मेंढरे मृत, 19 बेपत्ता

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / (चंद्रकांत हगलगुंडे) : तुळजापूर तालुक्यातील अणदूर (ता. तुळजापूर) येथे शनिवारी संध्याकाळी मुसळधार पावसामुळे दुर्दैवी घटना घडली. सिद्धू घोडके या मेंढपाळ कुटुंबावर काळाचा घाला कोसळला असून त्यांच्या १३ मेंढ्यांचा मृत्यू झाला तर १९ मेंढरे बेपत्ता झाली आहेत. या घटनेत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घडलेली घटना अशी की, सिद्धू घोडके आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन कोट्याकडे परतत असताना मुसळधार पावसाने परिसरात हाहाकार माजवला. पावसाच्या पाण्यामुळे कॅनॉलमध्ये प्रचंड वेगाचा प्रवाह आल्याने संपूर्ण कळप त्यात वाहून गेला. यामध्ये १३ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला तर १९ मेंढरे अद्याप बेपत्ता आहेत. रात्रीचा अंधार व मदतीला कोणीही न आल्याने बचावकार्य कठीण झाले.

घटनेची माहिती मिळताच अणदूर सज्याचे तलाठी गायकवाड व पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून नुकसानाचा अहवाल तयार केला. तसेच ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेऊन मेंढ्यांचा शोध सुरू केला. विक्रांत दुधाळकर, रोहन दुधाळकर, विशाल गुड, अंकुश चीनकारे, बालाजी पापडे, बाळू घोडके यांनी शोधमोहीमेत मदत करत घोडके कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला.

या घटनेमुळे घोडके कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांच्या उपजीविकेचा मोठा आधारच हिरावला गेला आहे. ग्रामस्थांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदत व मदतकार्य हाती घेण्याची मागणी केली आहे.

 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!