राहुरी प्रतिनिधी (जावेद शेख) : कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस ठाण्यातच पत्रकारावर मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न, गलिच्छ शिवीगाळ व धमकीचे सूर लावणारा प्रकार घडल्याने संतापाची लाट उसळली आहे. हा प्रकार राहुरी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई राहुल यादव यांनी केला असून, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी राहुरी तालुका पत्रकार संघटनेने केली आहे.
गुरुवार, दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे नऊच्या सुमारास दैनिक सार्वमंथनचे संपादक अनिल कोळसे हे कणगर शिवारात बीड जिल्ह्यातील काही लोकांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेबाबत चौकशी करत होते. याबाबत पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांच्याकडून माहिती घेत असताना, कोळसे हे चित्रीकरण करीत होते. त्यावेळी पोलीस शिपाई यादव यांनी संतापाने धावत येत कोळसे यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला व गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर, त्यांनी “पत्रकार गेला माझ्या…” असे अश्लाघ्य उद्गार काढत भर पोलीस ठाण्यातच गुंडागर्दी केली.
या वेळी पोलीस कर्मचारी सुरज गायकवाड व बाबासाहेब शेळके यांनी हस्तक्षेप करून यादव यांना रोखले. मात्र त्यांचा आक्रोश कमी झाला नाही. घटनेनंतर राहुरी तालुका पत्रकार संघटनेने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देत यादव यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी केली. यावर सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन ठेंगे यांनी दिले.
या प्रकाराचा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, जिल्हाभरातील पत्रकार संघटना व संपादकांनीही एकमुखी निषेध व्यक्त केला आहे.
निवेदन देतेवेळी ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी, संजय कुलकर्णी, प्रसाद मैड, गोविंद फुणगे, सुनिल रासने, मनोज साळवे, रियाज देशमुख, जावेद शेख, रमेश खेमनर, श्रीकांत जाधव, संजय संसारे, अनिल कोळसे, शरद पाचारणे, ऋषिकेश राऊत, सोमनाथ वाघ, अशोक मंडलिक, अय्यूब पठाण, कर्णा जाधव, सतिष फुलसौंदर, दीपक साळवे, सागर दोंदे, विलास गिर्हे, समर्थ वाकचौरे आदी पत्रकार उपस्थित होते.
पत्रकार संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल.
राहुरी पोलीस ठाण्यात पत्रकाराला दमबाजी – मोबाईल हिसकावून शिवीगाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी

0Share
Leave a reply












