SR 24 NEWS

क्राईम

अवैध फटाक्यांच्या गोडावूनवर पोलिसांचा धडक छापा ; चिंचोलीत ३१ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

Spread the love

राहुरी (प्रतिनिधी) : दिवाळीसण तोंडावर आला असताना अवैधरीत्या फटाक्यांची साठवणूक करणाऱ्यांविरोधात राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील चिंचोली येथील लोकवस्तीतील किराणा दुकानात विनापरवाना साठवलेले तब्बल ३१ लाख ८४ हजार ७७० रुपयांचे फटाके जप्त करण्यात आले.

रविवार (दि. २१ सप्टेंबर) रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाट, हवालदार सूरज गायकवाड, पोलिस शिपाई प्रमोद ढाकणे व रवि पवार यांच्या पथकाने पंचासमक्ष चिंचोली येथील सुमित ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी विविध कंपनींचे मोठ्या प्रमाणात फटाके आढळून आले. या प्रकरणी दुकानदार सुमित नंदकुमार रांका (३१, रा. चिंचोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोलिस हवालदार सूरज गायकवाड यांनी दिली असून गुन्हा रजिस्टर न. १०७४/२५ अन्वये कलम २८८ बीएनएस व ९ (ब) स्फोटक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुदाम शिरसाट करीत आहेत.

चिंचोलीतील या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. भरगच्च लोकवस्तीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा करणे हे गंभीर धोक्याचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कोणतीही दुर्घटना घडली असती तर जबाबदारी कोणाची ठरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान, ग्रामीण भागातील एका छोट्या गावात लाखोंचा साठा आढळून येणे हे एका मोठ्या विक्री-जाळ्याचे संकेत असल्याची चर्चा रंगली आहे. यामागे इतर व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तविली जात असून पोलिसांनी आणखी सखोल तपास करून या रॅकेटमधील मोठे मासे गळाला लावावेत, अशी मागणी होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!