राहुरी प्रतिनिधी (आर. आर. जाधव) १२ सप्टेंबर : राहुरी तालुक्यातील अपघातांच्या मालिकेला वाचा फोडत आज (दि. १२ सप्टेंबर) सकाळी माजी मंत्री प्राजक्त तनपूरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नगर–मनमाड राज्य महामार्गावर तब्बल तीन तास चक्काजाम आंदोलन केले. अपघातात मृत्यू पावलेल्या शशिकांत तुकाराम दुधाडे (वय ६५, मुंजोबा नगर, राहुरी) यांच्या मृतदेहासह हे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
गेल्या पंधरा दिवसांत राहुरी तालुका हद्दीत झालेल्या अपघातांमध्ये सात जणांचा बळी गेला आहे. आज सकाळी आठच्या सुमारास शशिकांत दुधाडे हे नातवाला शाळेत सोडून परत येत असताना धरमाडी गेस्ट हाऊसजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी या अपघाताचे दृश्य पाहण्यासाठी जात असलेला राहुरी खुर्द येथील कृष्णा सोमनाथ गोल्हार (वय २२) याला शनि शिंगणापूर फाटा येथे अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांनी प्राजक्त तनपूरे यांच्या नेतृत्वाखाली दुधाडे यांच्या मृतदेहासह मुळा नदीच्या पुलाजवळ अचानक आंदोलन छेडले. संबंधित ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी नागरिकांची ठाम मागणी होती. या आंदोलनामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. तब्बल तीन तास महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेवटी प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळताच आंदोलन स्थगित करण्यात आले.
या वेळी माजी खासदार प्रसाद तनपूरे, रावसाहेब चाचा तनपूरे, हर्ष तनपूरे, अनिल कासार, साहेबराव म्हसे, रवींद्र मोरे, सागर तनपूरे, गजानन सातभाई, नंदकुमार तनपूरे, विराज धसाळ, अक्षय तनपूरे, दिपक त्रिभुवन, संतोष चोळके, कांता तनपुरे, राजेंद्र बोरकर, निलेश शिरसाठ, नरेंद्र शिंदे, ओंकार कासार, अशोक कदम, पांडूभाऊ उदावंत, सौरभ उंडे, किशोर दुधाडे, पप्पू कोरडे यांच्यासह शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply













