तुळजापूर प्रतिनिधी दि.१२ (चंद्रकांत हगलगुंडे) : अणदूर गावातील पाच युवक मित्रांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाल, फेटा, पुष्पगुच्छ यासारख्या दिखाव्याला बगल देत विविध सामाजिक उपक्रम राबवले. या वेगळ्या उपक्रमामुळे जिल्हाभरात कौतुकाची लाट उसळली असून इतरांनीही अशाच उपक्रमांचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या सामाजिक उपक्रमांतर्गत गौरी-महालक्ष्मी देखावा, विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आणि सामान्य ज्ञान स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. गावकऱ्यांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवला. पहिल्यांदाच अशा प्रकारची उपक्रममाला गावात राबवण्यात आल्याने ग्रामस्थांत विशेष समाधान व अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्याला लातूर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर व ज्येष्ठ विचारवंत भगीरथ उर्फ नाना कुलकर्णी गुरुजी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
हा सोहळा रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारक येथे संपन्न होणार असून कार्यक्रमाला गावातील मान्यवर, नागरिक व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. संयोजकांनी या प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहून सामाजिक उपक्रमाचा साक्षीदार व्हावे, असे आवाहन केले आहे.
अणदूर गावातील पाच युवकांच्या पुढाकारामुळे सामाजिक जाणिवेला नवा आयाम मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Leave a reply













