(राहुरी प्रतिनिधी) ७ सप्टेंबर : नगर-मनमाड रस्त्यावर होत असलेल्या अपघातांची भीषण मालिका थांबविण्यासाठी आणि शासनाला जाब विचारण्यासाठी माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ८ सप्टेंबर २०२५) सकाळी १० वाजता तहसील कार्यालय, राहुरी येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक संघटना तसेच युवक वर्ग सहभागी होणार असून या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नगर-मनमाड महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असून निरपराध नागरिकांचे जीव या रस्त्यावरील दुरवस्थेमुळे जात आहेत. शासन आणि संबंधित विभागाकडून दुरुस्तीची कामे संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याविरोधातच शासनाला जाब विचारण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.
माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “नगर-मनमाड रस्त्यावरील मृत्यूचे सापळे आता थांबलेच पाहिजेत. शासनाला लोकांच्या जीविताचे महत्त्व पटवून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवणे आवश्यक आहे.”
या मोर्चात शेतकरी, कामगार, व्यावसायिक, महिला, तरुणाई यांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. अपघातग्रस्त कुटुंबीयांचा यात सहभाग असेल अशीही माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. मोर्चादरम्यान शासनाला ठोस मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत पाठविण्यात येणार आहे.
अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील मृत्यूच्या सापळ्याविरोधात प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या राहुरीत भव्य मोर्चा

0Share
Leave a reply












