SR 24 NEWS

इतर

आरडगावच्या सरपंच सुरेखा रवींद्र म्हसे यांना “आदर्श सरपंच” पुरस्काराने सन्मानित, ग्रामविकास व महिला सक्षमीकरणातील योगदानाबद्दल सुरेखा म्हसे यांचा गौरव

Spread the love

राहुरी, ता. ७ (प्रतिनिधी) / सोमनाथ वाघ :  टाकळीभान (ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) येथे ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था आयोजित पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात आरडगाव (ता. राहुरी) ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. सुरेखा रविंद्र म्हसे यांना श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती वंदनाताई मुरकुटे यांच्या हस्ते “आदर्श सरपंच पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. ग्रामीण विकास, पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग, महिला सक्षमीकरण तसेच ग्रामपंचायतीच्या उत्तम कार्यपद्धतीची राज्यभरात घेतलेली दखल या पुरस्कारामागील मुख्य कारण ठरली.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या सौ. नंदाताई दिलीप म्हसे, सौ. पल्लवी नितीन काळे, सौ. स्वाती किशोर गागरे, तसेच सरपंच सौ. सुरेखा म्हसे यांच्या भगिनी सौ. उज्वला संतोष झुगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ग्रामपंचायतीच्या एकात्मिक कार्यशैलीचे आणि सामाजिक दायित्वाचे विशेष कौतुक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

गेल्या काही वर्षांपासून आरडगाव ग्रामपंचायतीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्तुत्य उपक्रम राबवले आहेत. स्वच्छता अभियान, जलसंधारण, वृक्षलागवड, महिला बचत गटांचे सशक्तीकरण, तरुणांसाठी कौशल्य विकास शिबिरे, तसेच ग्रामविकासातील महिला सहभाग या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून आरडगावने आदर्श निर्माण केला आहे. या कार्यामागे सरपंच सौ. सुरेखा म्हसे यांचे नेतृत्व निर्णायक ठरल्याचे विशेष अधोरेखित करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारताना सरपंच सौ. सुरेखा म्हसे म्हणाल्या, “हा पुरस्कार केवळ माझा नाही, तर संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थांचा आहे. पुढील काळातही पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा आमचा निर्धार आहे.”

ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान देण्यात येतो. यंदा राहुरी तालुक्यातून सौ. सुरेखा म्हसे यांची “आदर्श सरपंच” म्हणून निवड होणे ही केवळ आरडगावच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!