राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलिसांनी घातक शस्त्रांनिशी जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा मुख्य सूत्रधार कैलास रामू धोत्रे (रा. देवळाली प्रवरा) यास अटक करून मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणातील इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, प्रमुख आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होता. दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी देवळाली प्रवरा येथील शेतकरी शंकर नारायण देशमुख यांच्या वाड्यात घुसून चार चोरट्यांनी घातक शस्त्रांच्या साहाय्याने जबरी चोरी करत दोन बकऱ्या कारमधून चोरून नेल्या होत्या. या घटनेनंतर राहुरी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३९५, ३९७ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या घटनेनंतर चोरट्यांनी चोरी केलेल्या बकऱ्या घेऊन जात असताना त्यांना राहुरी फॅक्टरी येथे स्थानिक नागरिकांनी थांबवून त्यांच्याशी झटापट केली व पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी चार चोरांपैकी एक आरोपी सनी उर्फ कृष्णा मुकेश सूर्यवंशी याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर इतर तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत उर्वरित आरोपी – विशाल उर्फ पिण्या विष्णू बर्डे (रा. वाळूंज वस्ती, देवळाली प्रवरा), दादा राजू बर्डे (रा. देवळाली प्रवरा) अनिल दत्तू पवार (रा. देवळाली प्रवरा) यांना अटक केली होती. मात्र गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कैलास रामू धोत्रे हा फरार होता.
दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी कैलास रामू धोत्रे हा देवळाली प्रवारा येथे आल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ. गणेश लिपणे यांच्या पथकाने आरोपीस शिताफिने ताब्यात घेऊन मान्य न्यायालयापुढे हजर करून पोलीस कस्टडी रिमांड ची विनंती केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री देवदत्त भवार साहेब, यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस, पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ. गणेश लिपणे, पोकॉ. शेषराव कुटे यांच्या पथकाने केली.
Leave a reply













