राहुरी (प्रतिनिधी) /ज्ञानेश्वर सुरशे : तालुक्यातील चिंचोली ते तांभेरे या इतर जिल्हा मार्ग क्रमांक ६० हा मार्ग चिंचोली ते प्रवरा उजव्या कालव्या दरम्यानचा १ कि.मी. अंतरात नुकत्याच डांबरीकरण झालेल्या रस्त्याची अवजड वाहनांच्या वाहतुकीने अत्यंत दुरावस्था झाली असून हा रस्ता म्हणजे ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता’ अशी अवस्था झाली आहे. स्थानिक व परिसरातील नागरिक या जीवघेण्या रस्त्याच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत.
चिंचोली ते तांभेरे हा इतर जिल्हा मार्ग क्रमांक ६० हा परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी अतिशय महत्त्वाचा असा मार्ग आहे. परिसरातील पाच, सहा गावांना नगर-मनमाड महामार्गाला जोडणारा मुख्य मार्ग म्हणून याकडे पाहिले जाते. यावरून शेतशिवारातील पिकांना बाजारपेठेत नेण्यासाठी बरोबरच परिसरातील विद्यार्थ्यांना चिंचोली येथे शिक्षणासाठी जाण्या-येणे, रूग्णांना दवाखाना, तसेच अबालवृध्दांना विविध गरजा भागविण्यासाठी दररोज या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून याचे वर्षभरापुर्वी काम झाले आहे. चिंचोली ते चिंचोली शिवारातील प्रवरा उजव्या कालव्या दरम्यानच्या रस्त्याचे चिंचोली, पाटिलवाडी ते कोल्हार खुर्द रस्त्याचे काम अगोदरच झाले होते.
मात्र या रस्त्याची वहन क्षमता साधारण दहा टनाची असताना प्रवरा उजव्या कालव्याजवळ असलेल्या कारखान्याचा कच्चा अथवा पक्क्या मालाचे साहित्याची ने-आण करत असलेल्या अवजड वाहनामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे रस्त्याची डागडुजी केली, तरीही रस्ता लवकरच खड्डेयुक्त होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगर-मनमाड महामार्गालगत चिंचोली गाव असून वारंवार रस्ता फुटत असल्याने ग्रामपंचायत या खड्ड्यात स्वखर्चाने मुरूम भरते आहे. मात्र अवजड वाहनांच्या वर्दळीने आठ दहा दिवसात परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. अवजड वाहतूकीच्या कारखान्याचा स्थानिक कर कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीला मिळतो मात्र भुर्दंड चिंचोली ग्रामपंचायतीवर येत आहे. त्यामुळे ‘रेड्याला दुखणं नि पखालीला इंजेक्शन’ अशी अवस्था चिंचोली ग्रामपंचायतीची झाली आहे.
यावर काही ज्येष्ठ जाणकारांचे मत आहे की, साधारण १० टन क्षमतेच्या रस्त्यावरून दुप्पट, तिप्पट वहन क्षमतेची अवजड वाहने चालवायची असल्यास सदरच्या कारखाना मालकाने स्वखर्चाने हा एक कि.मी चा रस्ता बांधावा, स्थानिक चिंचोली ग्रामपंचायतीला वारंवार मुरूम टाकून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी नाहक आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
या रस्त्यावरून मोठमोठी अवजड वाहने सतत ये-जा करत असतात कालव्यालगत असलेल्या कारखान्याचा स्थानिक कर कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीला मिळतो. परंतू रस्ता दुरूस्तीचा खर्च वारंवार चिंचोली ग्रामपंचायतीच्या माथी येतो. यावर संबंधित कारखाना मालक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून योग्य तो मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सौ. शोभाताई रावसाहेब लाटे, सरपंच ग्रामपंचायत चिंचोली
सदरच्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आहे. विद्यार्थी संख्या हजारावर आहे. लोकवस्तीही मोठी आहे. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरून महिला, मुलांना चालणे अतिशय जिकरीचे होत आहे. अवजड वाहनांमुळे आताच डांबरीकरण झालेल्या रस्त्याची पाच- सहा महिन्यातच चाळण झाली आहे. संबंधित विभागाने लक्ष घालून रस्त्याच्या वहन क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणारी वाहनांवर पायबंद घालणे महत्वाचे आहे.
– गणेश हारदे, माजी सरपंच चिंचोली
चिंचोली-तांभेरे रस्ता गेला खड्ड्यात; अवजड वाहनामुळे रस्ता वारंवार नादुरूस्त, नागरिक त्रस्त

0Share
Leave a reply












