मानोरी (प्रतिनिधी) / सोमनाथ वाघ : शेतकऱ्यांच्या कष्टांचे व श्रमाचे प्रतीक असलेला बैलपोळा सण मानोरी गावात यंदा अतिशय मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि पारंपरिक थाटामाटात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच गावात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची विशेष सजावट केली होती. अंगावर आकर्षक रंगांची उधळण, कपाळावर कुंकू-हळदीचे टिळे, गळ्यात मणी-फिती, झुलणाऱ्या घंटा, पायात घुंगरू, काही ठिकाणी नक्षीदार जीन व रंगीबेरंगी वस्त्रे अशा थाटामध्ये सजवलेल्या बैलांकडे गावकऱ्यांचे लक्ष वेधले जात होते.
संध्याकाळी मारुती मंदिरासमोर ढोल-ताशांच्या गजरात बैलजोड्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी महिला, पुरुष, लहान मुले, तरुण मंडळी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. पारंपरिक पोशाखांत सजलेले ग्रामस्थ एकत्र जमून या सोहळ्याचा आनंद घेत होते. मिरवणुकीनंतर शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीच्या साथीदारांची पूजा केली. हरभरा, गूळ, लाह्या, फळे व गोड पदार्थ अर्पण करून बैलांना मानाचे स्थान देण्यात आले. यावेळी गावातील एकोपा, ऐक्य आणि परंपरेचे दर्शन घडले.
मारुती मंदिराच्या वेशीला तोरण बांधले जाते. परंपरेप्रमाणे बैलांचा मान राखत “तोरण तोडण्याचा मान” यंदा शिवाजी उरमुडे यांना देण्यात आला. या सन्मानाने वातावरणात अधिक जल्लोष भरला.या प्रसंगी उपसभापती रविंद्र आढाव, सरपंच प्रतिनिधी बापूसाहेब वाघ, सोसायटीचे चेअरमन शरदराव पोटे, ग्रामपंचायत सदस्य शामराव आढाव, एकनाथ आढाव, दादासाहेब आढाव, तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब ठुबे, सामाजिक कार्यकर्ते मनोज खुळे, माजी उपसरपंच अण्णासाहेब तोडमल, सोसायटीचे संचालक भास्कर भिंगारे, माजी चेअरमन नवनाथ थोरात, माजी उपसरपंच शिवाजी थोरात, भाऊसाहेब आढाव, पै. संजय डोंगरे, मेजर चांदभाई पठाण, विकास वाघ, बाळासाहेब पोटे, राजूभाई पठाण, कैलास आढाव, नामदेव पोटे, बापूसाहेब डोंगरे, गणीभाई शेख, विलास थोरात, शामदभाई शेख, संतोष गोसावी, शौकतभाई पठाण आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैलपोळ्यामुळे मानोरी गावात दिवसभर उत्साह, जल्लोष आणि आनंदाचे वातावरण होते. परंपरेचा वारसा जपत आणि मेहनतीच्या साथीदाराला सन्मान देत हा सण यंदाही गावकऱ्यांच्या मनात संस्मरणीय ठरला.
Leave a reply













