येवले आखाडा (राहुरी) : राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथून गेल्या ३ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय मुलाचा घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. येवले आखाडा येथील रहिवासी असलेला तुषार गोरक्षनाथ शेटे वय १६ हा राहत्या घरातून बेपत्ता झाला होता. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाच्या अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी राहुरी पोलिसांकडून तपास सूरु असताना नातेवाईकांनी बेपत्ता तुषार याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळुन आला नव्हता. आज सोमवारी सकाळी येवले आखाडा हद्दीत असलेल्या एका विहिरीत तुषार याचा मृतदेह मिळून आला असता तातडीने राहुरी पोलिसांना घटनेबाबत माहिती देण्यात आली.
राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार तुळशीदास गीते यांनी घटनास्थळी धाव घेतली. तुषार याचा मृतदेह विहिरीतून काढून रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास राहुरी पोलीस करीत असून घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a reply













