सिंदेवाही (प्रतिनिधी – रोशन खानकुरे) : आज दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदगाव (ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) आणि ग्रामपंचायत नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “माझी वसुंधरा अभियान 6.0” अंतर्गत वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून भव्य वृक्षदिंडीने झाली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचे फलक, घोषवाक्ये आणि जोशपूर्ण नारे देत गावातील रस्त्यांवरून रॅली काढली. “झाडे लावा – झाडे जगवा”, “पृथ्वी वाचवा – जीवन वाचवा”, “हरित महाराष्ट्र – स्वच्छ महाराष्ट्र” अशा घोषणांनी संपूर्ण नांदगाव हरित संदेशांनी दुमदुमून गेले.
रॅलीनंतर शाळा परिसरासह ग्रामपंचायत हद्दीतील विविध जागांवर वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी एक झाड लावून त्याची देखभाल करण्याचा संकल्प केला. झाडांप्रती प्रेम, जबाबदारी आणि जाणीव निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचा प्रभावी उपयोग झाला.
या कार्यक्रमात ग्रामपंचायत सरपंच, सर्व सदस्य, गावातील नागरिक, शाळेतील शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या उपक्रमामध्ये गावातील शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ, महिलावर्ग आणि अंगणवाडी कर्मचारी यांनी खांद्याला खांदा लावून एकत्र काम केले. विद्यार्थ्यांच्या आनंदाने भरलेल्या चेहऱ्यांवर त्यांनी घेतलेला पर्यावरण पूरक संदेश स्पष्टपणे दिसून येत होता. “निसर्गासाठी लावलेले एक झाड हा आपल्या भावी पिढीचा श्वास आहे,” हा संदेश त्यांनी कृतीतून अधोरेखित केला.
नांदगाव शाळेचा वृक्षदिंडी व वृक्षारोपण उपक्रम हा केवळ एक पर्यावरणपूरक कार्यक्रम नव्हता, तर एकसंघ गावाच्या हरित संस्कृतीचा प्रेरणादायी अध्याय ठरला आहे. विद्यार्थ्यांपासून सरपंचांपर्यंत, शिक्षकांपासून ग्रामस्थांपर्यंत सर्वांनी दाखवलेली एकजूट ही इतर गावांसाठी आदर्शवत ठरू शकते.
Leave a reply













