पाथर्डी (प्रतिनिधी) : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे तलाठी आणि खाजगी इसमाने संगनमताने ५०,००० रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार 31 जुलै रोजी उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांच्या पथकाने रंगेहाथ सापळा रचून ही कारवाई केली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उप अधीक्षक श्री. अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
अहिल्यानगर येथील २६ वर्षीय तरुणाने दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांच्या नावावर प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर घरकुलाच्या बांधकामासाठी नदी पात्रातून मुरूम व वाळू आणण्यात आली होती. हे साहित्य जागेवर खाली करत असताना तलाठी सतीश धरम (वय ४०, तलाठी सजा आडगाव, चार्ज तिसगाव) आणि नायब तहसीलदार सानप यांनी रात्रीच्या सुमारास पाहणी केली.
यानंतर तलाठी धरम यांनी तक्रारदारास धमकावले की, “गौण खनिजांची अवैध वाहतूक केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल; मात्र ही कारवाई टाळायची असल्यास नायब तहसीलदारांसाठी ५०,००० रुपये द्यावे लागतील.” या मागणीनंतर तक्रारदाराने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलीस उप अधीक्षक श्री. अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला आणि ५०,००० रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी सतीश धरम यांना रंगेहाथ पकडले. ही रक्कम त्यांनी खाजगी इसम अक्षय घोरपडे (वय २७, रा. शिंगवे केशव) याच्याकडे सुपूर्द केली होती. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पाथर्डी पोलीस ठाण्यात सुरू आहे. ही कारवाई भारत तांगडे (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र), मा. माधव रेड्डी (अप्पर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदरची कारवाई अजित त्रिपुटे पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर, रवी निमसे पो /कॉ, बाबासाहेब कराड पो /कॉ, हारून शेख – चालक पो/हवालदार यांनी यशस्वी सापळा लावुन केली आहे. लाचखोरी विरोधातील ही कारवाई प्रशासनातील भ्रष्टाचाराला लगाम घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे ५० हजारांची लाच घेताना तलाठयासह खाजगी इसम लाचलूचपतच्या जाळ्यात

0Share
Leave a reply












