सिंदेवाही (चंद्रपूर) / रोशन खानकुरे : गणेशोत्सव 2025 शांततेत, सामाजिक सलोख्याने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी आज दिनांक 29 जुलै 2025 रोजी सिंदेवाही पोलीस ठाण्यात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. ही बैठक दुपारी 12.00 ते 1.50 या वेळेत झाली. बैठकीस सिंदेवाही तालुक्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, मूर्तिकार व डीजे/धुमाळ ऑपरेटर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांनी सर्व उपस्थितांना गणेशोत्सव शांततेत आणि अनुशासित पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. पोलीस प्रशासनास संपूर्ण सहकार्य करण्याची विनंतीही त्यांनी केली.बैठकीमध्ये विविध स्तरांवर सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.
गणेश मंडळांसाठी मंडप व मूर्ती स्थापनेसाठी परवानग्या घेणे, वाहतूक अडथळा होणार नाही याची काळजी घेणे, मजबूत आणि वॉटरप्रूफ मंडप उभारणे, सीसीटीव्हीची व्यवस्था करणे आणि मिरवणुकीदरम्यान डीजे व ध्वनीप्रदूषण टाळण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, मिरवणुकीदरम्यान धार्मिक स्थळांसमोर गुलाल उधळणे, थांबणे व आपत्तीजनक गाणी वाजवणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले.
मूर्तिकारांसाठी, मूर्ती उंची शासन निर्देशांनुसार ठेवावी, कोणत्याही जाती-धर्माचे प्रतीकात्मक स्वरूप असू नये आणि प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडू मातीचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या.
डीजे/धुमाळ ऑपरेटरांसाठी, ध्वनीप्रदूषण होईल अशा वाद्यांचा वापर न करणे, महिलांना लज्जास्पद वाटतील अशा गाण्यांचा प्रसार न करणे आणि लेझर लाइट्स किंवा भडक प्रकाशयोजना टाळाव्यात अशा सूचना देण्यात आल्या.
या बैठकीला सुमारे 100 ते 120 गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गणेशोत्सवाचा कालावधी हा भक्ती, शिस्त आणि सामाजिक सौहार्द जपणारा असावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच उत्सवाच्या कालावधीत पोलीस प्रशासनास पूर्ण सहकार्य करण्याची विनंती सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी यावेळी केली.
Leave a reply














