श्रीरामपूर प्रतिनिधी (25 जुलै) : कोल्हार चौकातील इंडिया वन एटीएम फोडण्याचा कट पुन्हा एकदा उधळला गेला असून, बेलापूर पोलिसांनी तडाखेबंद कारवाई करत तीन आरोपींना सिनेस्टाईल पाठलागानंतर अटक केली. सदर आरोपींनी याआधी दोन वेळा एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. बेलापूर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई केली. एका सुज्ञ नागरिकाने एटीएमजवळ संशयास्पद गाडी पाहून पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर लोखंडे यांना माहिती दिली. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असता, संशयित आरोपी निळ्या रंगाच्या मारुती 800 गाडीत बसलेले होते. पोलिसांना पाहून त्यांनी गाडी वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला.
लोखंडे यांनी तत्काळ कॉन्स्टेबल भारत तमनर यांना पाठलाग करण्याचे निर्देश दिले. ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, हवालदार बाळासाहेब कोळपे आणि पंकज सानप यांना देण्यात आली. पोलिसांनी बेलापूर-पढेगाव-कान्हेगाव मार्गावर त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. गाडी वेगात लाडगावमार्गे जात असताना, एका मिरवणुकीमुळे आरोपींची गाडी थांबली आणि पोलिसांना जवळ जाण्याची संधी मिळाली. मात्र, आरोपींनी पुन्हा वेग घेतला आणि गाडी एका खड्ड्यात पलटी झाली. तेव्हाच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तीनही आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, रस्त्यावरून जाताना या गाडीमुळे काही नागरिक जखमी झाले होते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पलटी झालेल्या गाडीतील आरोपींना बाहेर काढून चोप दिला. पोलिसांनी हस्तक्षेप करत आरोपींना सुरक्षित ताब्यात घेतले. गाडीतून बनावट पिस्तुल, दोरी, टॉमी, काळे कपडे, मास्क, गॉगल तसेच पेट्रोल भरलेला कॅन मिळून आला.
पोलिसांनी अपघातग्रस्त गाडी बेलापूर पोलीस ठाण्यात आणून ठेवली आहे. तिघेही आरोपी जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कोल्हार परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले असून, सजग नागरिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
कोल्हार चौकातील एटीएम फोडण्याच्या प्रयत्नातील तिघे ‘सिनेस्टाईल’ पाठलागानंतर जेरबंद, बेलापूर ते लाडगावपर्यंत थरार; गाडी उलटली आरोपींकडून बनावट पिस्तुल व साहित्य जप्त

0Share
Leave a reply












