SR 24 NEWS

इतर

एलसीबीच्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, निरीक्षक आहेर यांची नियंत्रण कक्षात बदली, एलसीबीतील अंतर्गत गटबाजी, वादांवर नियंत्रण ठेवण्याचे कबाडींपुढे मोठे आव्हान

Spread the love

अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) प्रभारी पदावर होणाऱ्या बदलाची चर्चा अखेर संपली आहे. निरीक्षक दिनेश आहेर यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली असून, त्यांच्या जागी जळगाव येथून बदली होऊन आलेले निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची एलसीबीच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या बदलाचे आदेश बुधवारी (दि. २३ जुलै) रात्री उशिरा काढण्यात आले. निरीक्षक आहेर यांच्याकडे ४ एप्रिल २०२३ रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या कार्यकाळात एलसीबीची सूत्रे देण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांहून अधिक कार्यकाळात त्यांनी खून, दरोडे, जबरी चोरी, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी केली. अनेक गुन्ह्यांतील मुख्य आरोपींना अटक करण्यात एलसीबीला यश आले. मात्र, काही प्रकरणांमुळे एलसीबी चर्चेत राहिली. खासदार नीलेश लंके यांनी एलसीबीच्या विरोधात उपोषण केले होते, तसेच ‘ग्रो मोअर’ फसवणूक प्रकरणात एलसीबीवरील संशयिताशी आर्थिक देवाण-घेवाणीचा आरोपही गाजला.

या पार्श्वभूमीवर निरीक्षक आहेर यांची बदली करत एलसीबीची सूत्रे निरीक्षक कबाडी यांच्याकडे देण्यात आली आहेत. कबाडी हे यापूर्वी चाळीसगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी होते. मात्र, त्या ठाण्यातील एका अंमलदाराच्या लाचखोरी प्रकरणामुळे त्यांची बदली नियंत्रण कक्षात झाली होती. या प्रकरणावरून आमदार मंगेश चव्हाण यांनी आंदोलनही छेडले होते.

वादग्रस्त पार्श्वभूमी असूनही अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कबाडी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालणे आणि पोलिस दलातील अंतर्गत गटबाजीवर नियंत्रण ठेवणे ही त्यांच्या समोरची मोठी आव्हाने असणार आहेत. अधीक्षक घार्गे यांचा विश्वास सार्थ ठरवण्याची कसोटी आता निरीक्षक कबाडी यांच्यापुढे आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!