शनीशिंगनापूर प्रतिनिधी : शनि शिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थान ट्रस्टमधील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (शुक्रवार) विधानसभेत या विश्वस्त मंडळाची तत्काळ बरखास्तगी करण्याची घोषणा केली. देवस्थानच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर अपारदर्शकता आणि बनावट कर्मचारी दाखवून आर्थिक लूट केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी दोषी असलेल्या विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचे आमदार विठ्ठल लंघे यांनी या घोटाळ्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले की, देवस्थानने तब्बल २,४७४ बनावट कर्मचारी दाखवून त्यांच्या खात्यांमध्ये पगाराच्या नावाखाली पैसे वर्ग केले. देवाच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी ट्रस्टच्या व्यवहारांची चौकशी केलेल्या सरकारी समितीच्या अहवालातील धक्कादायक माहिती सभागृहात वाचून दाखवली. बनावट अॅप्सद्वारे लाखो भक्तांकडून पूजेसाठी देणग्या गोळा करून त्या पैसे कार्यकर्त्यांच्या खात्यात वळवले जात असल्याचे निष्पन्न झाले. सायबर सेलच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांमार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.
फडणवीस म्हणाले की, पूर्वी मंदिरात केवळ २५८ कर्मचारी होते तेव्हा कारभार सुरळीत चालत होता, पण विश्वस्त मंडळाने विनापरवानगी हजारो बनावट कर्मचारी नेमले. याच मुद्द्यावर आधी तक्रारी आल्यानंतर केलेल्या विशेष ऑडिटमध्ये एका धर्मादाय अधिकाऱ्याने क्लिनचिट दिली होती. आता त्या अधिकाऱ्याचीही खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे.
शिर्डी आणि पंढरपूर येथील संस्थानांच्या धर्तीवर शनि शिंगणापूर देवस्थानच्या व्यवस्थेसाठी शासकीय समिती स्थापन केली जाणार आहे. दरम्यान, फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल.
घोटाळ्याची रक्कम १०० ते ५०० कोटींच्या दरम्यान?
आ. विठ्ठल लंघे यांनी एकूण घोटाळा १०० कोटी रुपयांपर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त केला, तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा घोटाळा ५०० कोटी रुपयांचा असल्याचा गंभीर आरोप करत ट्रस्टचे विश्वस्त दर आठवड्याला दहा-दहा कोटींच्या जमिनी खरेदी करत असल्याची माहिती दिली. शनि शिंगणापूर सारख्या श्रद्धास्थळी होत असलेल्या भ्रष्ट कारभाराने साऱ्याच स्तरांमध्ये खळबळ उडाली असून, शासनाच्या या कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट बरखास्त ; कोट्यवधींचा घोटाळा उघड, फडणवीसांची विधानसभेत घोषणा

0Share
Leave a reply












