राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील श्री दत्त सेवा मंडळ आषाढी वारी पायी दिंडीला गुरुवारी 3 जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता भोसेपाटीजवळ करकंब-पंढरपूर रस्त्यावर अपघात झाला. भरधाव वेगाने चाललेल्या पिकअप वाहनाने दिंडीच्या रथाला जोडलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यात ९ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. करकंब येथे चार जणांवर, तर अहिल्यानगर येथील रुग्णालयात पाच जणांवर उपचार सुरू आहेत.
अपघातातील जखमी जितेंद्र प्रभाकर शिंदे, मुकेश जालिंदर वाळके, शरद भारत करपे, दीपक रमेश गायकवाड (चौघेही रा. टाकळीमियाँ) यांच्यावर करकंब येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी दिलीप आडगळे, सुभाष चौधरी, सुरेश पाचरणे, भाऊराव शेजूळ, देवराम निकम (सर्वजण रा. टाकळीमियाँ) यांच्यावर करकंब येथे खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून, त्यांना दिंडीतील वारकरी विकास बोबडे यांनी अहिल्यानगर येथे पुढील उपचारासाठी आणले आहे.
पंढरपूरनजीक भोसेपाटी येथे काल (बुधवारी) दिंडी मुक्कामी होती. आज (गुरुवारी) पहाटे साडेपाच वाजता मुक्कामाच्या ठिकाणावरून दिंडीतील रथाला जोडलेला ट्रॅक्टर (एमएच १७सीएक्स २५७२) घेऊन चालक सुभाष चौधरी करकंब-पंढरपूर रस्त्यावर येत होते. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव पिकअप वाहनाने रथाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक दिली. पिकअपसह चालक फरार झाला. या अपघातात ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली. त्यात ९ वारकरी गंभीर जखमी झाले. ट्रॅक्टर-ट्रॉलीचे मोठे नुकसान झाले.
याप्रकरणी ट्रॅक्टरमालक भागवत लक्ष्मण तोडमल (वय ३२, रा. टाकळीमियाँ) यांच्या फिर्यादीवरून करकंब पोलिस ठाण्यात अज्ञात पिकअपचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अपघातग्रस्त वारकर्यांना लोकप्रतिनिधी आणि शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी. तसेच या वारकर्यांच्या उपचारासाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी गावच्या सरपंच सौ.लीलाबाई गायकवाड, शामराव निमसे, केशवराव शिंदे, रविंद्र मोरे, प्रताप निमसे यांच्यासह स्वामी अखंडानंद महाराज दिंडी व शंकर पार्वती दिंडीतील वारकर्यांनी केली आहे.
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील दिंडीला भीषण अपघात ; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली, नऊ वारकरी जखमी

0Share
Leave a reply











