SR 24 NEWS

क्राईम

श्रीरामपुरात खळबळ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केला पतीचा खून; श्रीरामपुरात खळबळ

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर  : श्रीरामपूर शहरातील दत्तनगर परिसरात चारित्र्याच्या संशयातून आणि दारूच्या नशेत होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीनेच पतीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भानसकुमार भानसकुमार साहु (रा. दत्तनगर, श्रीरामपूर) हा गेल्या काही दिवसांपासून सतत दारू पिऊन घरी येत असे. तो पत्नी रश्मिता भानसकुमार साहु हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन वारंवार वाद घालत तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता. शनिवारी (दि. २४) सकाळी सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वादाचे रूपांतर गंभीर प्रकारात झाले. रागाच्या भरात रश्मिता साहु हिने घरातील आंब्याच्या लाकडाने पती भानसकुमार याच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. त्यानंतर त्याचा गळा आवळून त्याचा जागीच मृत्यू केला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस कॉन्स्टेबल कैलास झिने यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे करीत आहेत. कौटुंबिक वादातून झालेल्या या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेची शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!