पुणे प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेत अजित पवार गंभीर जखमी झाल्याची चर्चा असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या वृत्तामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचा ताबा सुटला आणि विमानाला अपघात झाला.
अपघातानंतर विमानातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. या घटनेत विमानाचे मोठे नुकसान झाले असून, अजित पवार यांच्यासह त्यांच्या सोबत असलेले काही कर्मचारी व सुरक्षा रक्षकही जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. सर्व जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अजित पवार जखमी झाल्याची बातमी पसरताच बारामतीसह परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नियोजित सभांच्या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते विमानतळ व रुग्णालयाकडे धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना व कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड किंवा अन्य कोणते कारण याबाबत तपास करण्यासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला बारामतीत अपघात; गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती

0Share
Leave a reply












