राहुरी प्रतिनिधी : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत ५ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात एक आरोपी ताब्यात घेण्यात आला असून ट्रॅक्टरचा मालक फरार आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकी विरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक गठीत करण्यात आले.
दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि. संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार रमीराजा आत्तार, भगवान थोरात, विशाल तनपुरे व चालक महादेव भांड यांचे पथक राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू उत्खननाबाबत माहिती घेत असताना, गुप्त बातमीदारामार्फत शेरीचिखलठाण गावच्या शिवारातील वनविभागाच्या क्षेत्रातून ट्रॅक्टरद्वारे वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
त्या माहितीच्या आधारे पथकाने शेरी चिखलठाण ते संगमनेर रोडलगत सापळा रचून एक लाल रंगाचा ट्रॅक्टर थांबवला. तपासादरम्यान ट्रॅक्टर चालकाने आपले नाव सुनिल रेवजी भुतांबरे (वय २१, रा. सुतारवाडी, शेरीचिखलठाण, ता. राहुरी) असे सांगितले. वाळू वाहतुकीबाबत परवाना मागितला असता, त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या मालकाबाबत चौकशी केली असता जमीर पिरन सय्यद (रा. शेरी चिखलठाण, ता. राहुरी) असे नाव सांगण्यात आले असून तो सध्या फरार आहे.
कारवाईदरम्यान आरोपीकडून ५,००,००० रुपये किमतीची ट्रॅक्टर-ट्रॉली व १०,००० रुपये किमतीची १ ब्रास वाळू, असा एकूण ५,१०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भगवान बाळासाहेब थोरात यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ६८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम ३/१५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी केली आहे.
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत वाळू माफियाविरोधात गुन्हे शाखेची धडक कारवाई, ५ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी ताब्यात, एक फरार

0Share
Leave a reply












