SR 24 NEWS

सामाजिक

आशा कार्यकर्त्या व बचत गट प्रमुखांच्या योगदानामुळे ग्रामीण विकासाला गती – ललिता राक्षसे, स्व. चंद्रकांत अण्णा धमूरे प्रतिष्ठानतर्फे आशा कार्यकर्त्या व बचत गट प्रमुखांचा सन्मान

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : ग्रामीण भागात सामाजिक घडी मजबूत करण्यासोबतच बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे मोलाचे कार्य आशा कार्यकर्त्या व महिला बचत गट प्रमुख करत असून, त्यांच्या योगदानामुळेच ग्रामीण अर्थचळवळीला गती मिळत आहे, असे प्रतिपादन तुळजापूर येथील टाटा सामाजिक संस्थेच्या प्रमुख ललिता राक्षसे यांनी केले.

त्या अणदूर येथे स्वर्गीय चंद्रकांत अण्णा धमूरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आशा कार्यकर्त्या व महिला बचत गट प्रमुखांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.कार्यक्रमाच्या प्रारंभी सामाजिक योगदान देणाऱ्या आशा कार्यकर्त्या व बचत गट प्रमुख महिलांचा संस्थेच्या वतीने भेटवस्तू, शाल व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

पुढे बोलताना राक्षसे म्हणाल्या की, ग्रामीण भागात २४ तास सेवा देणाऱ्या आशा कार्यकर्त्या व बचत गटातील महिलांचा गावाच्या सर्वांगीण विकासात सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निस्वार्थ सेवेने आरोग्य, स्वावलंबन व सामाजिक एकोपा यांना खऱ्या अर्थाने बळ मिळते. अशा महिलांचा सन्मान हा त्यांच्या कार्याची पोचपावती ठरून त्यांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण करतो, असेही त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविकात अनिल घुगे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे काम प्रतिष्ठान सातत्याने करत आहे. समाजात एकोपा निर्माण होऊन चांगल्या कार्याचे कौतुक झाल्यास सामाजिक नवसंजीवनी मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, डॉ. प्रा. एम. बी. बिराजदार, अविनाश मोकाशे, गुणवंत मुळे, राम भंडारकवठे, सचिन गुड, महादेव स्वामी, मकरंद भालकरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार बंधू, आशा कार्यकर्त्या, महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल घुगे यांनी केले. राधा दुपारगुडे, सन्मानपत्रांचे वाचन महेश्वरी धमूरे यांनी केले, तर शिवशंकर तिरगुळे यांनी आभार प्रदर्शन केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!