SR 24 NEWS

इतर

उद्योजक विजय सेठी यांच्या कंपनीकडून विमान निर्मितीला सुरुवात

Spread the love

राहुरी प्रतिनिधी :  सैन्य व निमलष्करी दल, नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदत व बचावकार्य तसेच शेती क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या ‘मायक्रोलाईट एअरक्राफ्ट’च्या उत्पादनाचा भारतात अधिकृत श्रीगणेशा झाला आहे. राहुरी येथील उद्योजक विजय सेठी यांच्या मॅक्स लिंक कंपनीने पुणे येथे अत्याधुनिक आणि हलक्या वजनाच्या विमानांचे उत्पादन सुरू केले असून, त्यामुळे भारतीय विमानउद्योगाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.

मायक्रोलाईट एअरक्राफ्ट हे कमी खर्चिक, इंधन बचत करणारे आणि अल्प धावपट्टीवरून उड्डाण करू शकणारे विमान प्रकार असून त्याचा उपयोग सीमावर्ती भागातील गस्त, आपत्तीग्रस्त भागात अन्न व औषधांचा पुरवठा, हवाई सर्वेक्षण, शेतीतील फवारणी तसेच प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर केला जाऊ शकतो. यामुळे पारंपरिक मोठ्या विमानांवरील खर्च आणि वेळ वाचण्यास मदत होते.

विजय सेठी यांनी सन २०१८ मध्ये आफ्रिकेतील ‘मायक्रो एव्हिएशन’ या नामांकित कंपनीसोबत तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उत्पादनासाठी करार केला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या कोविड-१९ महामारीमुळे जागतिक पातळीवर उद्योगक्षेत्र ठप्प झाले आणि या प्रकल्पाला काही काळ विलंब सहन करावा लागला.

पुणे येथे स्वतंत्र प्रकल्प उभारून मायक्रोलाईट एअरक्राफ्टचे उत्पादन सुरू करण्याचे सेठी यांचे नियोजन होते. आवश्यक परवानग्या, तांत्रिक बाबी आणि पायाभूत सुविधा उभारणीच्या प्रक्रियेनंतर आता प्रत्यक्षात पुणे जवळ विमाननिर्मितीला सुरुवात झाली आहे. हे उत्पादन पूर्णतः ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला चालना देणारे असून देशांतर्गत गरजांबरोबरच भविष्यात निर्यातीचीही मोठी संधी निर्माण होणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना तांत्रिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून भारताला मायक्रोलाईट विमाननिर्मितीच्या क्षेत्रात स्वतंत्र ओळख मिळेल, असा विश्वास सेठी यांनी व्यक्त केला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!