नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव शासकीय कार्यक्रमात जाणीवपूर्वक वगळणे हा लोकशाही आणि राज्यघटनेचा गंभीर अवमान आहे, असा ठपका ठेवत वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
२६ जानेवारी रोजी नाशिक येथील पोलीस परेड मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. मात्र या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका जबाबदार मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारची कृती होणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले.
या घटनेचे पडसाद नांदेड जिल्ह्यात उमटले असून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नायगाव येथील हेडगेवार चौक परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “महामानवाचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांचा निषेध असो,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
या आंदोलनात बालाजी गायकवाड रातोळीकर (जिल्हा सचिव), दिपक गजभारे घुंगराळेकर (जिल्हा उपाध्यक्ष), बाळासाहेब सोनकांबळे (जिल्हा सहसचिव), तालुकाध्यक्ष साहेबराव कोपरेकर, तालुका उपाध्यक्ष सतीश वाघमारे, प्रभाकर घंटेवाड, विलास वाघमारे, साईनाथ जिगळेकर, साईनाथ नामवाडे, भूषण काळेवार, विशाल भद्रे, राजू भद्रे, दीपक जमदाडे, राहुल गायकवाड, गणेश वालंबे, सचिन भेदे, शुद्धधन लांडगे, संदेश वाघमारे, राजेंद्र रेड्डी टाकळीकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महामानवांचा अवमान करणाऱ्या संबंधित मंत्र्यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी आंदोलकांच्या वतीने देण्यात आला.
महामानवाचे नाव वगळणे म्हणजे लोकशाही व राज्यघटनेचा अवमान; वंचित बहुजन युवा आघाडीचा तीव्र निषेध

0Share
Leave a reply












