राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील कणगर येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची १६ वर्षे ८ महिने वयाची मुलगी शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाली. सर्वत्र शोध घेऊनही मुलगी मिळून आली नाही. तिला कोणीतरी अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी सौरभ लाहुंडे (रा. टाकळीमिया) या संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रवीण बागुल हे तांत्रिक मदतीच्या आधारे पुढील तपास करत आहेत.
Leave a reply













