प्रतिनिधी : ज्ञानेश्वर सुरशे : सोनई (ता. नेवासा) येथील इंदिरानगर भागात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना सोनई पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेला ९० हजार रुपये किमतीचा पूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १५ जानेवारी २०२६ रोजी अमोल सोमनाथ फुलारे यांच्या आजीच्या बंद घराची खिडकी तोडून अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये रोख आणि ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ९० हजारांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३३१(३) आणि ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, ही चोरी गावातीलच अमित सोमनाथ फुलारे (वय २६) आणि मनोज कचरू शिंदे (वय २७) यांनी केली असून ते मुद्देमालासह त्रिलिंग महादेव मंदिरामागे थांबले आहेत. पोलिसांनी तातडीने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ८० नोटा ५०० रुपयांच्या (४०,००० रोख), १० ग्रॅमचे मंगळसूत्र आणि ५ ग्रॅमची कर्णफुले असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे अहिल्यानगर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे (श्रीरामपूर) तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नीरज राजगुरू (शेवगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कामगिरीत सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. माळी यांच्यासह पोसई लबडे, पोहेकॉ. बाळासाहेब बाचकर, पोहेकॉ. तागड, पो.कॉ. गणेश गावडे, पो.कॉ. निखिल तमनर व पो.कॉ. प्रविण क्षिरसागर यांनी सहभाग घेतला.
Leave a reply













