SR 24 NEWS

इतर

टाकळी ढोकेश्वर येथील सौरऊर्जा प्रकल्प अखेर कार्यान्वित, सरपंच अरुणा खिलारी यांच्या पाठपुराव्याला यश; शेतकऱ्यांना दिवसा विजेचा दिलासा

Spread the love

पारनेर विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे उभारण्यात आलेला सौरऊर्जा प्रकल्प एक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज कार्यान्वित झाला. ग्रामपंचायतीच्या सरपंच अरुणा खिलारी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला असून, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू झाला आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत उभारण्यात आलेल्या या सोलर पार्कचे लोकार्पण आवादा कंपनीचे नंद साहेब व तिवारी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या प्रकल्पामुळे टाकळी ढोकेश्वर येथील विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सुमारे २१ गावांतील वीजेचा प्रश्न सुटला असून, शेतीसाठी दिवसा अखंडित वीज उपलब्ध होणार आहे. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे शेती सिंचनाची मोठी समस्या मार्गी लागणार असून, लोडशेडिंगचा ताणही कमी होणार आहे. मंगळवारपासून वीजपुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार निलेश लंके यांनी पारनेर मतदारसंघात शेतकऱ्यांच्या हितासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार टाकळी ढोकेश्वर येथे हा सोलर पार्क उभारण्यात आला. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा प्रकल्प मंजूर झाला आहे.

या प्रसंगी माजी सरपंच शिवाजी खिलारी, सामाजिक कार्यकर्ते संजय झावरे, दौलत जेजुरकर, छोटूभाई हवलदार, सचिन चिकने यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवादा कंपनीचे नंद व तिवारी साहेब यांनी सांगितले की, “या सोलर पार्कमधून निर्माण होणारा ९ मेगावॅट वीजपुरवठा टाकळी ढोकेश्वर उपकेंद्रास दिला जाणार असून, त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळणार आहे.”


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!