तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : मराठवाडा, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर नळदुर्ग येथील जागृत देवस्थान श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रा महोत्सव येत्या २ ते ४ जानेवारी या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या जयघोषात व भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत नळदुर्ग परिसर भक्तिमय व सुवर्णमय होणार असून, यंदा यात्रेसाठी ६ ते ७ लाख भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून महाराष्ट्रातील खंडोबाच्या एकूण १२ प्रमुख स्थानांपैकी मैलारपूर हे दुसरे महत्त्वाचे स्थान मानले जाते. विशेष म्हणजे श्री खंडोबा व बानाबाई यांचा विवाह याच पवित्र स्थळी झाला, अशी आख्यायिका आहे. गेल्या दीड महिन्यांपासून प्रत्येक रविवारी येथे यात्रोत्सव सुरू असून पौष पौर्णिमेच्या यात्रेने या उत्सवाची सांगता होणार आहे.यात्रेचा मुख्य दिवस शनिवार, ३ जानेवारी रोजी आहे. या दिवशी पहाटे देवाचा महाअभिषेक व महापूजा संपन्न होईल. दिवसभर भाविकांकडून नवस फेडण्याचे कार्यक्रम, तसेच पारंपरिक वाघ्या–मुरळी नृत्य सादर केले जाणार आहेत. यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध गावांतून येणारे मानकरी नंदीध्वज व काटे होत.
दि. ३ जानेवारी रोजी रात्री सुमारे १२ वाजता अणदूर–नळदुर्ग येथील मानाच्या काट्याचे मंदिरात आगमन होईल. यावेळी होणारी आतशबाजी व शोभेच्या दारूचे प्रात्यक्षिक अत्यंत नेत्रदीपक असते. दोन्ही गावांच्या मानकऱ्यांचा सत्कार, वाजत–गाजत निघणारा छबिना आणि भंडाऱ्याची उधळण याने यात्रेची सांगता होईल. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थानकडून विशेष दर्शनरांग व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
दि. ४ जानेवारी रोजी राज्यस्तरीय भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार असून, लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विशेष नियोजन असलेल्या या कुस्ती आखाड्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे. भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता अचूक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रा शांततेत, सुरक्षित व यशस्वीरीत्या पार पडावी यासाठी मंदिर समिती, यात्रा कमिटी व नळदुर्ग नगरपरिषद अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
मैलारपूर नळदुर्ग येथील श्री खंडोबा देवाची यात्रा – ३ जानेवारी रोजी ६ ते ७ लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षित

0Share
Leave a reply












