SR 24 NEWS

राजकीय

बिलोली, धर्माबाद , देगलूर मधील बॅक वॉटरमुळे निर्माण होणाऱ्या संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढा : खा. डॉ. अजित गोपछडे यांची राज्यसभेत आग्रही मागणी 

Spread the love

नांदेड प्रतिनिधी /धम्मदिप भद्रे : नांदेड जिल्ह्यातील बिलोली ,धर्माबाद आणि देगलूर या तीनही तालुक्यांमध्ये तेलंगणातील श्रीराम सागरच्या बॅक वाटरमुळे निर्माण होणाऱ्या विदारक परिस्थिती आणि अपरिमित हानीबाबत खा. डॉक्टर अजित गोपछडे यांनी आज राज्यसभेत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. हजारो शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर वरील पिकांना दरवर्षी बसणारा फटका , गावकऱ्यांचे होणारे नुकसान आणि त्यातून निर्माण होणारे आर्थिक संकट यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारमध्ये सरकारची संयुक्त बैठक बोलविण्यासाठी तातडीने समिती स्थापन करावी अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यसभेच्या आजच्या अधिवेशनात खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या मानवनिर्मित बॅकवॉटर पुरपरिस्थितीचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. बिलोली, धर्माबाद आणि देगलूर तालुक्यातील ८० हून अधिक गावे तेलंगणातील श्रीराम सागर प्रकल्पाच्या (SRSP/पोचमपाड जलाशय) विसंगत व अवैज्ञानिक जलसंचालनामुळे गंभीर पूर संकटाला तोंड देत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक गावांची संपूर्ण शेती दरवर्षी पाण्याखाली जात असून पिके, पशुधन, घरे व गावांचा पायाभूत संरचनेचे प्रचंड नुकसान होत आहे.

यानुषंगाने आज सभागृहात प्रश्न उपस्थित करताना खा.डॉ. अजित गोपछडे म्हणाले की , ही नैसर्गिक आपत्ती नसून प्रशासनातील समन्वयाअभावी निर्माण झालेली मानवनिर्मित शोकांतिका आहे.दरवर्षी पावसाळ्यात अचानक वाढणाऱ्या या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य, उपजीविका आणि मानसिक स्थिती उद्ध्वस्त होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे केंद्र सरकार, विशेषतः केंद्रीय जल आयोगाने (CWC) महाराष्ट्र–तेलंगणा संयुक्त जल-समन्वय यंत्रणेची स्थापना करावी. वैज्ञानिक व बंधनकारक जलसंचालन नियमावली तयार करून कठोर पालन करावे. सर्व प्रभावित गावांचे जिओ-टॅग सर्वेक्षण करून DBT द्वारे कायम (स्थायी) मावेजा देण्यात यावा .

केंद्राच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तांत्रिक–प्रशासकीय समिती स्थापन करावी. बाभळी (धर्माबाद) प्रकल्पाशी संबंधित जलविवादाचा समावेश करून स्थायी समाधान काढण्यात यावे. नांदेडच्या सीमांत भागातील शेतकऱ्यांची ही वार्षिक शोकांतिका तातडीने थांबवण्याची वेळ आल्याचे सांगत, डॉ. गोपछडे यांनी केंद्र सरकारने निर्णायक पावले उचलून कायमस्वरूपी उपाययोजना अंमलात आणाव्यात, अशी विनंतीही खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आज केंद्र सरकार आणि सभागृहाला केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!