राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी शहरातील राजवाडा परिसरात काल सायंकाळच्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवी वस्तीत वन्यप्राण्यांची वाढती वर्दळ आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली बिबट्यांची संख्या यामुळे परिसरातील रहिवासी भयभीत झाले आहेत.
राजवाडा परिसरातून नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या शेजारी हा बिबट्या अचानक दिसल्याची माहिती समोर आली. बिबट्याचे अनपेक्षित दर्शन होताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून “शहरातच बिबट्या फिरू लागला तर सुरक्षितपणे घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे,” अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली.
घटनेनंतर नागरिकांनी वनविभाग व प्रशासनाकडे तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, वनविभागाने लवकरच बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती दिली.
नागरिकांनी सध्या घराबाहेर पडताना विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासोबतच बिबट्याच्या हालचालींबाबत संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित वनविभागाला कळवण्याची सूचना देण्यात आली आहे.
Leave a reply













