तुळजापूर, दि. ६ (चंद्रकांत हगलगुंडे) : राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख ठिकाण असलेल्या अणदूर बसस्थानकावर प्रवाशांची गैरसोय दिवसेंदिवस वाढत आहे. लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या उड्डाणपुलावरून थेट जात असल्याने स्थानकावर न थांबता प्रवासी अडचणीत सापडतात. तर स्थानिक बसचालक मात्र उपहारगृहांच्या अमिषामुळे भोंगा वाजवत नाश्त्यासाठी जास्त वेळ थांबतात, यामुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया जात आहे. प्रवाशांमध्ये असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे की, हा प्रकार महामंडळाचा आदेश आहे का साठे-लोटे व्यवहाराचा परिणाम? दोन्ही परिस्थितीत सामान्य प्रवाशांना व भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
अणदूर हे २५ हजारांहून अधिक लोकसंख्येचे व्यापारी केंद्र असून, येथे मुख्य बाजारपेठ, अनेक बँका, शैक्षणिक संस्था आणि खंडोबा देवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. दररोज शेकडो प्रवासी या मार्गावर प्रवास करतात. मात्र, एसटी महामंडळाच्या निष्क्रिय कारभारामुळे ‘आंधळा दळतोय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. प्रवाशांचा ठाम आग्रह आहे की, सकाळी ६ ते २ आणि दुपारी २ ते ६ या वेळेत वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करण्यात यावी, जेणेकरून बस वेळेत सुटतील आणि गोंधळ कमी होईल.
प्रवासी व भाविकांची मागणी आहे की, महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी अणदूर बसस्थानकास अचानक भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी, गैरसोयी दूर करून प्रवाशांना न्याय द्यावा.
Leave a reply













