तुळजापूर, दि. 24 (चंद्रकांत हगलगुंडे) : सोलापूर – खानापूर – उमरगा–कर्नाटक सीमा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची कहाणी म्हणजे भ्रष्टाचार, ढिसाळपणा आणि उदासीनतेचे उत्तम उदाहरण. तब्बल 14 वर्षांपासून सुरू असलेले हे काम अद्याप पूर्णत्वास पोहोचलेले नाही. संथ गतीने सुरू असलेले व निकृष्ट दर्जाचे काम पाहता, या रस्त्याचा वनवास कधी संपणार? हा प्रश्न वाहनचालकांना भेडसावत आहे.
बसस्थानक ते चिवरी पाटील दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम अद्याप अर्धवटच आहे. केवळ एका बाजूने वाहतूक सुरू असतानाही पुलावरील रस्त्याची चाळण झाली आहे. महिनाभरातच असंख्य खड्डे तयार झाल्याने वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. या भोंगळ, निकृष्ट व दिशाहीन कारभारामुळे प्रवाशांत तीव्र रोष व्यक्त होत आहे.
खानापूर–उमरगा मार्गावरची परिस्थिती तर अधिक भयावह आहे. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता, हेच कळेनासे झाले आहे. या रस्त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर कित्येकजण कायमचे अपंग झाले. तरीही जबाबदार अधिकारी आणि गुत्तेदार बेफिकीरच राहिले आहेत. लोकांच्या जिवाशी खेळणारा हा साठेलोट्यांचा कारभार थांबण्याचे नाव घेत नाही.या मार्गावरील बोगस व निकृष्ट कामाविरोधात अनेकदा रस्ता रोको, मोर्चे, टोल नाका बंद आंदोलन झाले. मात्र परिस्थिती जैसेथेच आहे. परिणामी, या मार्गावरील कामाचा खरा आका कोण? हा संतप्त सवाल जनतेतून सातत्याने ऐकू येत आहे.
अवघ्या महिनाभरातच उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य – अधिकारी-गुत्तेदारांच्या साठेलोट्यामुळे रस्त्याचे चांगभले!

0Share
Leave a reply












