अहिल्यानगर प्रतिनिधी १५ सप्टेंबर (वसंत रांधवण) : जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अहिल्यानगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात सतत कोसळणाऱ्या पावसाने शेतकरी तसेच सामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे. शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी उध्वस्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. लंके यांनी सांगितले की, “सततच्या पावसामुळे शेतीचेच नव्हे तर ग्रामीण भागातील रस्ते, घरे, वीज आणि पाणीपुरवठा यंत्रणेलाही मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे श्रम वाया गेले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत वितरित करावी.”
पावसामुळे अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून कामगारांपर्यंत सर्वांचे हाल झाले असून शेतकरी कर्जाच्या विळख्यात अधिक अडकण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार लंके यांनी जिल्हा प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून गावागावांत मदतकार्य सुरू करण्याची, पुरेशी मनुष्यबळ व यंत्रसामग्री तैनात करण्याची तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे.
निवेदनाद्वारे त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत, पीकविमा योजना त्वरीत अंमलात आणणे, तसेच घरांचे नुकसान झालेल्यांना योग्य तो दिलासा मिळावा यासाठी शासनाने सक्रिय पावले उचलावीत, अशी ठाम मागणी केली आहे.
अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत द्या ; खासदार निलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0Share
Leave a reply












