नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : नांदेड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून या तालुक्यात जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या अहवालानुसार विशेष आर्थिक मदतीचे पैकेज देऊन सर्व तालुक्यात सरसकट पीक विमा मंजूर करावा अशी मागणी खा.डॉ. अजित गोपछडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील नांदेडसह , बिलोली , देगलूर , मुखेड, कंधार, लोहा , धर्माबाद, उमरी , भोकर , नायगाव , अर्धापूर यासह दहा ते अकरा तालुक्यात दिनांक 28 आणि 29 ऑगस्ट रोजी ढगफुटीसह मुसळधार पाऊस पडला होता. नांदेड जिल्ह्यातील 53 महसुली मंडळांमध्ये किमान तीन किंवा त्याहून अधिक वेळा अतिवृष्टी झाली आहे . बिलोली तालुक्यातील मांजरा नदीच्या किनाऱ्यावरील गावांमध्ये पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीसह मुखेड मधील लेंडी तसेच कंधार मधील मन्याड या नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला होता. ढगफुटी सारख्या परिस्थितीमुळे मांजरा नदीच्या पाण्याची पातळी ही अचानक सहा मीटरने वाढली होती. गेल्या दोन दिवसापासून सतत पावसामुळे मांजरा नदीला पूर आलेला आहे.
पुरामुळे सर्व पिके पाण्याखाली बुडाले आहेत . नदीकाठच्या गावांना पुराचा जबरदस्त तडाखा बसलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यातील कृषी क्षेत्राचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस ,उडीद, हळद, केळी, भात व फळबाग शेती पाण्याखाली आलेली आहे. नांदेड जिल्ह्याच्या 93 पैकी 88 महसूल मंडळामध्ये सात लाख 53 हजार हेक्टर लागवडी पैकी काही ठिकाणी शंभर टक्के तर काही ठिकाणी 60 ते 70 टक्के पर्यंत पिकांचे नुकसान झाले आहे . कृषी क्षेत्रासोबतच पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे शेतकरी ही मोठ्या प्रमाणात संकटात आला आहे.
नांदेड शहरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. अनेक व्यापाऱ्यांची देखील नुकसान झाले आहे. बरेच ठिकाणी पूल , मोरी व रस्ते खचले आहेत . राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार तसेच एनडीआरएफच्या निकषानुसार विशेष आर्थिक मदत तात्काळ उपलब्ध करून द्यावी . तसेच सरसकट पीक विमा देण्यासाठी संबंधित विमा कंपन्यांना आदेशित करावेत अशी विनंती खा. डॉ . अजित गोपछडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार जी, महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव, श्रीमती अश्विनी भिडे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन सादर केले आहे.
पूरग्रस्त तालुक्यांना विशेष पैकेज द्या शिवाय सरसकट पीक विमा मंजूर करा : खा. अजित गोपछडे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

0Share
Leave a reply












