SR 24 NEWS

इतर

तमनर आखाडा येथे बिबट्याने एकाच रात्रीत पाडला शेळी व बोकड्याचा फडशा, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण परिसरात पिंजरा लावण्याची मागणी

Spread the love

तमनर  आखाडा  (राहुरी ) :  तमनर आखाडा परिसरात वन्यजीवांचा वावर वाढत चालल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. काल दिनांक 15 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास तमनर आखाडा येथील शेतकरी भारत दादा बाचकर यांच्या घरासमोर बिबट्याने अचानक हल्ला चढवून एका शेळी व एका बोकडाचा फडशा पाडला. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये मोठी भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाला कळविली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी सिनारे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी त्यांनी प्राण्यांच्या अवशेषांची तपासणी केली व घटनास्थळाजवळील खुणा पाहून बिबट्याचा हल्ला असल्याची खात्री केली.

ग्रामस्थांच्या मते, मागील काही दिवसांपासून गावाच्या हद्दीत बिबट्याचे दर्शन होत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र 15 ऑगस्ट रोजी झालेल्या या प्रत्यक्ष हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते. ग्रामस्थांनी वन विभागाकडे गावात व परिसरात पिंजरा लावावा अशी ठाम मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वन विभागाचे अधिकारी यांनी ग्रामस्थांना शक्य तितक्या लवकर पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याचे आश्वासन दिले आहे.दरम्यान, 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच सकाळी घडलेल्या या घटनेमुळे तमनर आखाडा परिसरातील वातावरण अधिकच चिंताजनक झाले आहे. शेतकरी व ग्रामस्थांनी पशुधन आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!